श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार ‘मित्राची गोष्ट’ आणि ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ नाटकांचे प्रयोग

मुंबई:नव्या कलाकारांना घडवत त्यांना उत्तम व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ‘सृजन’ने एक मिशन सुरू केलं. ‘सृजन द क्रियेशन’ ही फक्त कार्यशाळा नसून एक संस्था आहे.आणि एक सृजनशील संवेदनशील माणसांचे एक जागतिक कुटुंब आहे. ‘आपली स्पर्धा स्वतःशीच करावी’ हा मंत्र प्रत्येकाच्या मनावर बिंबवत आजवर वेगवेगळया उपक्रमांच्या माध्यमातून सृजन द क्रियेशनच्या कलाकारांनी अनेक स्पर्धांमध्ये जवळपास ३० च्या वर एकांकिका, अनेक दिर्घ अंक, ४० एक शॉर्टफिल्म केल्या आणि पुरस्कार पण मिळवले. त्यातल्याच विजय तेंडुलकर लिखित ‘मित्राची गोष्ट’ आणि अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या दोन नाटकांचे प्रयोग श्री शिवाजी मंदिर येथे रंगणार आहेत.

प्रत्येक नवोदित कलाकाराचं श्री शिवाजी मंदिर येथे प्रयोग करायचं स्वप्न असतं. सृजन द क्रियेशनच्या कार्यशाळेतील कलाकारांचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे. येत्या सोमवारी ५ फेब्रुवारीला दुपारी ३.३० वाजता ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ ह्या नाटकाचा आणि मंगळवारी ६ फेब्रुवारीला रात्री ८ वाजता ‘मित्राची गोष्ट’ ह्या नाटकाचा प्रयोग श्री शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. अर्थात हा सगळा घाट कलाकारांनी वर्गणी काढूनच घातला आहे. तेव्हा आपण सर्वांनी या प्रयोगांना येऊन आशीर्वाद , प्रोत्साहन द्यावे ही नम्र विनंती.

तर अशी ही नवोदित कलाकारांना घडवण्याची चळवळ सभासदांच्या वर्गणी मधून जमा झालेल्या रक्कमेवर, सहभागी कलाकारांनी वर्गणी काढून तसेच सृजन द क्रियेशनचे सर्वेसर्वा अभिनेता – दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या प्रयत्नांनी सुरु आहे. या स्तुत्य प्रयत्नांना बळ देत नव्या उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिकाधिक नाट्यरसिकांनी या प्रयोगांना उपस्थित राहण्याचे आवाहन राजेश देशपांडे यांनी केले आहे.