मुंबई :‘नव्या काश्मीरसह अखंड भारताचे स्वप्न आता टप्प्यात आले असून विस्तारवादी चीनला पायबंद घालण्या बरोबरच, बेरोजगारी, दहशतवाद आणि दगाबाजीने पिचलेल्या काश्मिरी जनतेसोबत येत्या काळात आपले ऋणानुबंध अधिक घट्ट होण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि लेखिका जयश्री देसाई यांनी केले. त्यांनी “नवा काश्मीर, अखंड काश्मीर” या विषयावर आपले विचार मांडले. काश्मीरचा इतिहास, तेथील सदैव अस्थिर आणि संवेदनशील परिस्थिती, राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण भौगोलिक स्थिती, कलम ३७० हटविण्यापूर्वीचे काश्मीर आणि त्यानंतरच्या काश्मीरचे वास्तव उपस्थितांसमोर मांडले. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका वर्गाच्या वतीने दि. वि. गोखले जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभाचे शनिवार दिनांक २५ मार्च २०२३ ला संस्थेच्या प्रेक्षागारात आयोजित करण्यात आला होता.
गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेच्या मराठी पत्रकारिता पदव्युत्तर पदविका यावर्षी वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांना दि. वि. गोखले पुरस्कार, डॉ.अरुण टिकेकर पुरस्कार आणि विद्याधर गोखले स्मृती पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार जयश्री देसाई, कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि संस्थेचे संचालक डॉ. केयूरकुमार नायक तसेच माजी वर्ग समन्वयक ज्येष्ठ पत्रकार नीला उपाध्ये यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावर्षीचा दि. वि. गोखले पुरस्कार वर्गातून प्रथम आलेले विद्यार्थी शुभम सरंगुले , डॉ.अरुण टिकेकर पुरस्कार डॉ.मनोज अणावकर आणि विद्याधर गोखले पुरस्कार शैलेश तवटे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी वर्गाच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘गरवारे दर्पण’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्गाच्या समन्वयक नम्रता कडू यांनी केले. वर्गाच्या रौप्यमहोत्सवी वाटचालीचा आढावा आपल्या स्वागतपर भाषणात घेऊन गोखले यांच्या झुंजार पत्रकारितेचा परिचय त्यांनी प्रारंभी करून दिला.
संस्थेच्या सह संचालक शिल्पा बोरकर, वर्गाचे शिक्षक ज्येष्ठ पत्रकार वैभव वझे, मृदुला राजवाडे,शैलेश कसबे आणि नवी मुंबई साहित्य परिषदेचे कार्यवाह मोहन ढवळीकर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.वर्गाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विद्यार्थ्यांना पुस्तकांच्या स्वरूपात बक्षिसे देण्यात आली. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाना अनुक्रमे २,५००,२,००० आणि १,५०० रुपयांची पुस्तके तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिकांसाठी ५०० रुपयांची पुस्तके देण्यात आली. प्रथम पुरस्कार वंदना मत्रे, द्वितीय पुरस्कार स्नेहा जोशी, तृतीय पुरस्कार दीपाली मराठे यांना प्रदान करण्यात आला तर उत्तेजनार्थ पारितोषिक सारिका मिसाळ आणि कल्पना देशमुख यांना देण्यात आले.
पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करताना गरवारेच्या वर्गाने दिलेल्या शिक्षणाचे आणि शिक्षकांनी केलेल्या व्यक्तिमत्त्व विकासाचे आणि संस्कारांचे महत्त्व सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणात अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी जुही धर्मे आणि आभार प्रदर्शन विद्यार्थी श्रेयस पांडे यांनी केले. छायाचित्रणाची जबाबदारी वर्गाचे विद्यार्थी समाधान पारकर यांनी सांभाळली, तर सुरेख रांगोळी वैष्णवी भोगले आणि अंकिता अभंग या विद्यार्थिनींनी काढली. सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत हिरीरीने सहभाग घेतला आणि हा कार्यक्रम यशस्वी केला.