मालाडमध्ये अप्पा पाडा आगीत भस्मसात झालेल्या झोपड्यांमधील कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वात स्वयंसेवी संस्थांचे गृहोपयोगी वस्तूंचे वाटप !

मुंबई: मालाड येथे अप्पा पाडाला १३ मार्च २०२३ ला लागलेल्या आगीत भस्मसात झालेल्या झोपड्यांमधल्या कुटुंबांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सहयोगी संस्थांद्वारे २६ मार्च २०२३ ला गृहोपयोगी वस्तूंचे वितरण करण्यात आले. महानगरपालिका आणि शासन तसंच स्वयंसेवकांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार १हजार १०० उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आधीच कुपन वितरीत करण्यात आली होती. या गृहोपयोगी वस्तूंमध्ये महिन्याभराचा शिधा, चटई, चादर, बादली, मग, स्वयंपाक बनविण्यासाठी साहित्य, ताट, वाटी तसेच छोट्या गॅस सिलेंडरचाही समावेश होता. समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी आवर्जून महिलांसाठी अंतर्वस्त्र आणि महिलांच्या गरजेच्या वस्तूंचाही यात समावेश केला होता त्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती.

अप्पा पाडा येथे महानगरपालिका आणि पोलिसांच्या सहकार्याने सर्वप्रथम भोजन व्यवस्था करण्यात आली.आपल्या नियमित रचनेनुसार रोज न्याहारी आणि दोन वेळा जेवण प्रत्यक्ष वस्तीतील हनुमान मंदीरात बनवून वितरीत करण्यात आले. यामध्ये सत्संग परिवाराच्या सहकार्यासह दैनंदिन ६० पेक्षा अधिक स्वयंसेवक योगदान देत होते. हनुमान मंदिर जुना आखाडाचे दहिसरचे श्री श्री १००८ श्री काशीदासजी महाराज यांनी मंत्रोच्चारात कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. यावेळी दिंडोशी भागाचे संघचालक विरेंद्रजी याज्ञिक आणि पुनर्वसन कार्यक्रमाचे मुख्य सुत्रधार दिंडोशी भाग सेवा शिक्षण प्रमुख शशीभुषण शर्मा, स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.