जुहू येथे विद्यानिधी शैक्षणिक संकुल कला-क्रीडाविष्कार सांगता सोहळा संपन्न !

मुंबई : जुहू येथील मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात कला क्रीडाविष्कार उन्हाळी शिबिर सांगता सोहळा संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक श्रीराम मंत्री यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे, या कार्यक्रमांमुळे या जन्मशताब्दी वर्षाला एक वेगळे वलय प्राप्त झाले आहे. मुंबई उपनगर शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक भारतीय खेळ आणि क्रीडा प्रकारांचे ११ एप्रिल ते २१ एप्रिलपर्यंत आयोजन करण्यात आले होते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणारी गोष्ट करायला मिळाली. व्यस्त जीवनातून थोडासा वेळ मनोरंजनासाठी दिला की, आपल्याला हवे ते साध्य करण्याची ताकद मिळते. यासाठीच शालेय पातळीवर विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन फार महत्त्वाचे आहे. कौटुंबिक वातावरणाच्या बाहेर, निसर्गाच्या साक्षीने एकत्रित येऊन स्वतंत्र कार्य करण्याचा आनंद मिळवणे, हा शुद्ध हेतू पूर्तीसाठी विद्यानिधी शैक्षणिक संकुलात उन्हाळी शिबीर आयोजित करण्यात आले होते. तसेच स्थानिक वातावरण आणि संस्कृतीशी निगडित खेळ क्रीडा प्रकारांचा आजच्या विद्यार्थ्यांना परिचय व्हावा, हा यामागील उद्देश होता.

शिबिराच्या सांगता सोहळ्यात विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील मराठी आणि इंग्रजी माध्यमामधील चार विद्या शाखांच्या विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिका, भोवरा फिरवणे, विटी दांडू, कांदा फोडी,चक्र फिरवणे, फुगडी, दांडपट्टा, तलवारबाजी, कुस्ती, कबड्डी, मल्लखांब, गोफण या क्रीडा प्रकारांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. या प्रात्यक्षिकांनी उपस्थित पालक आणि मान्यवरांची वाहवा मिळवली. तसेच जोडीला नृत्य आणि सुमधुर गीत गायन ही सादर करण्यात आले. विद्यानिधी शैक्षणिक संकुलात कला क्रीडाविष्कार उन्हाळी शिबिरात सामाजिक बांधिलकी जपत ३००विद्यार्थ्यांना विविध पारंपारिक खेळ शिकविण्यात आले.

‘आमच्याकडे उपनगर शिक्षण मंडळ आहे,चांगल्या शाळा आहेत, चागलं शिक्षण मिळतं. पण संस्कारच्या दृष्टीकोनातून स्वाभिमान जागृत करून मी भारतीय असून आमच्यात काही कमी नाही. आमच्याकडं ज्ञानाचा आणि अन्य क्षेत्राचं भांडार आहे, हे जागृत करण्याची आज सुरुवात आहे. भारत हा सशक्त आणि समृद्ध भारत आहे,’ असं प्रतिपादन मुंबई उपनगर शिक्षण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आणि नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य यांनी केले.

‘मुलांना एखाद्या खेळातून, कलेतून आणि कौशल्यातून आनंद मिळाला, त्यांची करमणूक झाली, की मुलांमध्ये व्यक्तिमत्त्व विकासाचा संस्कार रूजतो. हा संस्कार योग्य वयात रुजवण्याचं आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं कार्य विद्यानिधी विद्यालय करतं. उन्हाळी शिबिरात जे खेळ आणि ज्या कला तुम्ही आत्मसात केल्या आहेत. त्यातील तुम्हाला आवडणारी कला आणि खेळ निवडा. त्याचा नियमित सराव करा आणि प्राविण्य मिळवा. जेणेकरून तुम्हाला जगात मोकळे फिरण्याचं विश्व आणि करिअरचा पर्याय उपलब्ध होतो. आपली मुलं कुशाग्र बुद्धिमत्तेची (स्मार्ट) आहेत, ते त्यांच्याशी नियमित संवाद साधल्याने समजेल. पालकांनी मुलांना जास्त वेळ देऊन त्यांची आवड जपण्याची आवश्यकता आहे. शाळेत अभ्यासजत्रासारखे उपक्रम राबवले पाहिजे,’ असं पत्रकार विनित मासावकर यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला मुंबई उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि नागालँडचे माजी राज्यपाल पद्मनाभ आचार्य, मुंबई उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, रोटरीयन हेमांग जांगला, कविता आचार्य, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते. मराठी माध्यमिकच्या मुख्याध्यापिका नीलम प्रभू, प्राथमिकचे मुख्याध्यापक संतोष टक्के, इंग्रजी माध्यमिकचे मुख्याध्यापक सतीश दुबे, इंग्रजी प्राथमिकच्या मुख्याध्यापिका प्राजक्ता तांबे यांच्या नियोजनाने आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या मार्गदर्शकाखाली हे उन्हाळी शिबिर संपन्न झाले.