चतुरस्त्र अभिनेत्री मैथ्थिली जावकर ‘अशीच आहे चित्ता जोशी’ नाटकामध्ये पंचरंगी भूमिकेत!

मुंबई:’अशीच आहे चित्ता जोशी’ नाटकामध्ये मैथ्थिली जावकर सोबत अभिनेता रणजीत जोग नायकाच्या भूमिकेत तर लोकप्रिय गायिका- संगीतकार वैशाली सामंत नाटकाला प्रथमच संगीत देतेय. प्रख्यात दिग्दर्शिका सुधाताई करमरकर, प्रयोगशील दिग्दर्शक चेतन दातार आणि प्रतिभावंत दिग्दर्शक सत्यदेव दुबे यांच्या तालमीत अभिनयाचे धडे गिरवून, नंतर व्यावसायिकला प्रकाश बुद्धिसागर, दिलीप कोल्हटकर, गणेश यादव, संतोष पवार, आणि चंद्रकांत कुलकर्णी अशा मातब्बर दिग्दर्शकांसोबत थिएटर करत रंगभूमीवर पाय रोवून भक्कमपणे आपलं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी असलेली लोकप्रिय अभिनेत्री मैथ्थिली जावकर आज अभिनय, नृत्य, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी पंचरंगी लीलया पेलत लवकरच रसिकांना नव्या साजात दिसणार आहे. तिच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या महत्वाकांक्षी नाटकाद्वारे रंगमंचावर अवतरली आहे.

‘संस्कार भारती'(कोकण प्रांत) यांच्या सहयोगाने, ‘ओम साईनाथ प्रॉडक्शन्स’ निर्मित, ‘श्री चित्र- चित्रलेखा’ प्रकाशित २ अंकी सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या अत्यंत वेगळ्या संवेदनशील नाटकाची लेखिका, निर्माती, दिग्दर्शिका आणि चित्ता जोशी या शीर्षक भूमिकेत मैथ्थिली जावकर रंगमंचावर दिसणार आहे. तसेच घराघरात लोकप्रिय झालेल्या रामायण मालिकेतील ‘भरत’ अर्थात अभिनेते संजय जोग यांचा सुपुत्र आणि आजच्या दूरचित्रवाणी युगातला चमचमता तारा, अभिनेता रणजीत संजय जोग या नाटकात प्रमुख नायकाच्या भूमिकेत आहे.

मैथ्थिली जावकर या गुणी अभिनेत्रीने चित्रपट, नाटक, मालिका अशा सर्व क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. अभिनय, नृत्य निर्मिती अशा सर्व आघाड्यांवर त्यांनी अनेक वर्ष काम करून आपला एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. भरत नाट्यम या नृत्यकलेत पारंगत असलेल्या मैथ्थिली जावकर हिने आजमितीस शेकडो व्हिडीओ अल्बम्स, लावणी, लोकनृत्याचे शो प्रत्यक्ष सादर केले आहेतच. पण त्यासोबत स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘अग्निहोत्र’, ‘वादळवाट’, ‘चार दिवस सासूचे’, ‘दामिनी’, ‘घरकुल’ ‘इन्स्पेक्टर’ अशा ३७ मराठी मालिका तसेच ‘चारचौघी’, ‘शोभायात्रा’, ‘वा सुनबाई वाह!’, ‘आई परत येतेय’, ‘बायको असून ब्रम्हचारी!’, ‘सहकुटुंब.कॉम’, ‘दांडेकरांचा सल्ला’ अश्या अनेक लोकप्रिय १८नाटकांमधून भूमिका केल्या आहेत. ‘आधारस्तंभ’, ‘छबू पळाली सासरला’, ‘आई मला माफ कर’, ‘आता मी कशी दिसते?’, ‘बायको आली बदलून’, ‘आयला लोच्या झाला रे’, ‘खंडोबाच्या नावाने चांगभलं’, ‘माहेर चा निरोप’, ‘शांती ने केली क्रांती’, ‘मेनका उर्वशी’ इत्यादी २२ मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. तिने ‘कलर्स मराठी’च्या मराठी ‘बिग बॉस’ सिझन २’ शोमध्येही सहभाग घेतला होता.

अत्यंत वेगळ्या धाटणीच्या ‘अशीच आहे चित्ता जोशी’ या नाटकाच्या निमित्ताने मैथ्थिली व्यावसायिक नाटकाची लेखिका आणि दिग्दर्शिका बनते आहे. या नाटकात रणजीत संजय जोग, रुचीर गुरव ( स्वाभिमान फेम मयंक ), यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. एका ज्वलंत विषयावरील धगधगतं नाटक खास रसिकांसाठी येत असून नेमकी कशी आहे चित्ता जोशी? हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांनी नाटकाचा प्रयोग चुकवू नये.