प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादात ‘मराठी पाऊल पडते पुढे…’

मुंबई : एकीकडे मराठी चित्रपटाला चित्रपटगृहात स्थान नाही, अशी ओरड सुरू असताना आणि इतर मराठीसह अन्य भाषिक चित्रपट सुरू असताना मराठी पाऊल पडते पुढे या चित्रपटाला मराठी माणसाचा उदंड प्रसिताद लाभत आहे. शुक्रवार ५ मे पासून महाराष्ट्रभरातील सर्वच सिनेमागृहात प्रदर्शित झालेला हा चित्रपट अनोख्या प्रचार पद्धतीमुळे गेला महिनाभर चर्चेत राहिला. त्याचे पडसाद चित्रपटगृहात उमटले आहेत. एकूणच महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटगृहात चित्रपटाला जोरदार बुकिंग झाल्याचे दिसून आले. आणि त्यामुळे मराठी या नावाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

अनेक मराठी तरुणांना नोकरी सोडून व्यवसाय करण्याची आत्यंतिक इच्छा आहे. पण, नेमकं काय करायचं? सुरुवात कुठुन करायची? ध्येय निश्चित करून त्यावर मार्गस्थ कसे व्हायचे? या प्रश्नांच्या पलिकडे जाऊन मुलभूत आणि अत्यंत गरजेची असलेली व्यावसायिक मानसिकता आणि चिकाटी कशी जोपासायची, यांचे उद्बोधक आणि मनोरंजक उत्तर प्रकाश बाविस्कर निर्मित आणि शिवलाईन फिल्म्स प्रस्तुत ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाच्या माध्यमातून मिळत असल्याने खास करून तरुणांनी आणि व्यवसाय इच्छुक मराठी भाषिकांनी या चित्रपटाला पसंती दिल्याचे लक्षात येते.

लेखक-दिग्दर्शक स्वप्निल मयेकर यांनी लिहिलेल्या कथेमध्ये मराठी माणसाने अल्पसंतुष्ट मनोवृत्तीतून बाहेर पडून व्यवसाय करण्यासाठी लागणारी धमक कशी असावी, याचे दर्शन घडवले आहे. अकात फिल्म्सचे संचालक चंद्रकांत विसपुते हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटात चिराग पाटील, सिद्धी पाटणे, ज्येष्ठ अभिनेते अनंत जोग, सतीश पुळेकर, सतीश सलागरे, संजय कुलकर्णी, संजय क्षेमकल्याणी आणि प्रदीप कोथमिरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

निर्माता प्रकाश बाविस्कर यांनी चित्रपटाच्या माध्यमातून येणारा शंभर टक्के निव्वळ नफा हा मराठी तरूणांना व्यवसाय मार्गदर्शनासाठी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी, वृद्धाश्रमासाठी आणि या चित्रपटातील कलाकारांसाठी देऊ केला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या तिकीटासाठी खर्च झालेले आपले पैसे हे सामाजिक कार्यासाठी खर्च होणार असल्याने एका अनोख्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन प्रेक्षकांनीही प्रतिसाद देऊन घडवले आहे.