‘एक दोन तीन चार’ चित्रपटाचा धमाकेदार टिजर प्रदर्शित…

मुंबई:जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि ज्योती देशपांडे निर्मित एक नवीकोरी कथा असलेला “एक दोन तीन चार” हा चित्रपट येत्या नवीन वर्षात ५ जानेवारी २०२४ ला आपल्या भेटीला येत आहे. जिओ स्टुडिओजचा “एक दोन तीन चार” चित्रपटाचा धमाकेदार टिजर प्रदर्शित झाला आहे.

या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे ‘मुरांबा’ या बहुचर्चित चित्रपटानंतर वरूण नार्वेकर या दिग्दर्शकाचा हा पुढील चित्रपट असणार आहे. तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद निपुण धर्माधिकारी आणि वरुण नार्वेकर यांनी मिळून लिहिले आहेत.

जिओ स्टुडिओजच्या या नव्या चित्रपटात कलाकारांची दमदार टीम दिसणार आहे. चित्रपटातील मध्यवर्ती पात्र असलेल्या सायलीची भूमिका वैदेही परशुरामी हिनं केली आहे तर समीरची भूमिका निपुण धर्माधिकारीनं साकारली आहे. याव्यतिरिक्त मृणाल कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, सतीश आळेकर, शैला घाणेकर यांच्या देखील मुख्य भूमिका आहेत. यानिमित्ताने वैदेही आणि निपुण ही नवीन जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे तर या चित्रपटाच्या माध्यमातून निपुण धर्माधिकारी एक मोठी मध्यवर्ती भूमिका पहिल्यांदाच साकारताना दिसणार आहे.

जिओ स्टुडिओज् बरोबर या चित्रपटाची निर्मिती रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांच्या बहावा एन्टरटेन्मेंट आणि १६ बाय ६४ यांनी केली आहे.

आजच्या तरुण पिढीच्या आयुष्यात डोकावत प्रेम, लग्न अशा गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो हे विनोदाची अचूक पेरणी करत हलक्या फुलक्या पद्धतीने या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीसोबतच सर्व वयोगटातील प्रेक्षकवर्गासाठी जिओ स्टोडिओजची ही नवं वर्षाची मनोरंजनाची खास ट्रीट ठरणार आहे.