‘विश्व संवाद केंद्र – मुंबई’तर्फे ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४’ सोहळा उत्साहात संपन्न …
मुंबई: विश्व संवाद केंद्र, मुंबईतर्फे दरवर्षी पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव केला जातो.या वर्षीचा ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ सोहळा शनिवार दिनांक १७ ऑगस्ट २०२४ ला दादरच्या कीर्ती कॉलेज येथे उत्साहात संपन्न झाला.
या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. ब्रजेश कुमार सिंह (IPS) आपल्या संभाषणात म्हणाले की, ‘इराणपासून चीनपर्यंत केवळ एकच सक्षम लोकशाही आहे ती म्हणजे भारत. सध्याच्या पत्रकारितेच्या घसरलेल्या दर्जाबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. काही देशांच्या संसदेमध्ये सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जाते,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. याच विषयाला अनुसरून पुरस्कारार्थी सोशल मीडिया इन्फ्लूएंसर गौरव ठाकूर यांनी आजमितीला जे देशविघातक नॅरेटिव्ह पसरवले जात आहेत, ते आपण सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडले पाहिजे, असे नमूद केले. पुरस्कारार्थी ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी मनोगत व्यक्त करताना व्यावसायिक कारकिर्दीतील आपला हा पहिला पुरस्कार असल्याचे सांगितले.
माहिती देताना विश्व संवाद केंद्र, मुंबईचे मुख्य संवाद अधिकारी डॉ. निशीथ भांडारकर म्हणाले की, या सोहळ्याचे हे २३ वे वर्ष आहे आणि त्याच अनुषंगाने या वर्षी पत्रकारिता आणि सोशल मीडियामधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकुर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये या ८ जणांचा या ‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार २०२४’ देऊन गौरव करण्यात आला.
‘विश्व संवाद केंद्र, मुंबई’चे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी नारद पुरस्काराबद्दल माहिती सांगितली. या पुरस्काराकरिता अर्ज मागवले जात नाहीत, हे या पुरस्काराचे वैशिष्ट्य असल्याचे देखील त्यांनी सांगितले. निवड समिती पुरस्कारार्थींची निवड करते. मूल्याधिष्ठित पत्रकारिता करणारे आणि विशुद्ध चारित्र्याच्या पत्रकारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात राषट्रगीताने झाली, तर कार्यक्रमाची सांगता करताना सुधीर जोगळेकर यांनी आभार प्रदर्शन केले.