विद्यानिधी विद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात ‘गाथा शिवरायांची’

मुंबई:जुहू येथे मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी विद्यालय मराठी माध्यमिक विभागाचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शाळेच्या किशिनचंद वलेचा सभागृहात उत्साहात संपन्न झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० वर्षे पूर्तीनिमित्त ‘गाथा शिवरायांची’ या मुख्य सूत्रावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणविशेषांचा आदर्श विद्यार्थ्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न नृत्य आणि नाटिका या कलाकृतीतून सादर केला गेला.

स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री गौतमी मयुरेश, नामांकित कंपनीचा सचिव शाळेचा माजी विद्यार्थी सचिन खांडेकर असून संस्थेचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, माजी सचिव डॉ. कीर्तीदा मेहता, विद्यमान सचिव साधना मोढ, सदस्या जोत्स्ना कुलकर्णी, समाजसेवक मधु कुमार राठी उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थिनी संजीवनी चाळके, तिचे सहकारी आणि बसुराज गुरव यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांची अजूनही शाळेशी बांधिलकी असल्याचे दाखवून दिले.

आपल्या भाषणात दोन्ही अतिथींनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर उभा केला. तसेच शिवकालीन लाठी-काठी आणि मल्लखांब खेळांच्या प्रात्यक्षिकांबद्दल आभार मानले. असे कार्यक्रम विद्यानिधीसारख्या मराठी शाळेतून जोपासले जात आहेत आणि आपण मराठी शाळेत शिकलो आहोत याचा त्यांना अभिमान असल्याचे सांगितले. असाच अभिमान विद्यार्थ्यांनी ही बाळगावा असे साधना मोढ यांनी आपल्या मार्गदर्शनपर विचारात प्रतिपादन केले.