मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे ९ महिन्यांत राज्यातील ६ हजार २०० रुग्णांसाठी ५० कोटी ५५ लाखांची मदत वितरित!

मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे नऊ महिन्यांत राज्यातील ६ हजार २०० रुग्णांसाठी ५० कोटी ५५ लाखांची अर्थसहाय्य मदत वितरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं रुग्ण सेवेच्या माध्यमातून राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह त्यांच्या चमूनं रुग्णसेवेचं कार्य केलं आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षानं नऊ महिन्यांत कक्षाकडून ६ हजार २०० रुग्णांना एकूण ५० कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षानं पहिल्याच जुलै २०२२ महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख,डिसेंबर २०२२ महिन्यात ८ कोटी ५२ लाख रुपयांपर्यंत मदत देण्यात आली. जानेवारी २०२३ मध्ये ८ कोटी ८९ लाख आणि फेब्रुवारी २०२३ मध्ये विक्रमी १० कोटी २७ लाख आणि मार्च २०२३ मध्ये ११ कोटी ९५ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

‘राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचं तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो,’ असं मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितलं.