मुंबई : वनवासी कल्याण आश्रम आणि भांडुप मेडिकोज कम्युनिटी वेल्फेअर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने डहाणू येथे मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आंबेसरी गावातील बारी पाडा, गेयटी पाडा, मातेर पाडा आदी पाड्याच्या रहिवाशांना डॉ. राम शिंदे यांच्यासह १९ डॉक्टर, वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने ममता निमकर आणि १६ सहकारी वैद्यकीय तपासणी शिबिरात सहभागी झाले होते. त्यांना सर्च फाऊंडेशनच्या सचिव डॉ. दीपा बंडगर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
वैद्यकीय तपासणी शिबिरात रक्तदाब तपासणी, ब्लड शुगर, हेमोग्लोबिन तपासणी, त्वचा रोग तपासणी अशी विविध वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि गावातील वेगवेगळ्या पाड्यामधील ३५० रुग्णांनी वैद्यकीय शिबिराचा लाभ घेतला. यावेळी विविध आजारांवरील औषधे, मल्टिव्हिटॅमिन, कफ सिरप आदींचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना साड्या, शाल, चादरी यांचे वितरण करून लहान मुलांना खाऊचे वाटप केले.