३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा
पणजी: राजवर्धन इंगळेच्या नेतृत्वाखाली नेटबॉलमध्ये महाराष्ट्र संघाने गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये विजयाचे खाते उघडले. महाराष्ट्र पुरुष संघाने गटातील आपल्या दुसऱ्या सामन्यात यजमान गोवा संघाला घरच्या मैदानावर पराभूत केले. महाराष्ट्र संघाने ५०-५६ ने सामना जिंकला. यासह महाराष्ट्र संघाला गटात पहिल्या विजयाची नोंद करता आली. राजवर्धनच्या कुशल नेतृत्वासह रोमदेव, रोमदेव, गणेशच्या सर्वोत्तम खेळीतून महाराष्ट्र संघाला स्पर्धेत पहिला विजय साजरा करता आला. महाराष्ट्र संघाचा सलामी सामन्यात पराभव झाला होता. हरियाणा संघाने पहिल्या सामन्यात महाराष्ट्राचा पराभव केला होता.
मुख्य प्रशिक्षक महेश काळदाते आणि मिनेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र संघाने दमदार कमबॅक करत पहिला विजय नोंदवला. ‘संघातील सर्वच खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली.यामुळे संघाला स्पर्धेत शानदार कमबॅक करता आले. यादरम्यान राजवर्धनसह रोमदेव, सौरवची कामगिरी कौतुकास्पद ठरली. सर्वोत्तम पासिंगच्या बळावर संघाने विजयश्री खेचून आणली,’ अशा शब्दात प्रशिक्षक मिनेश महाजन यांनी विजेत्या संघातील खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव केला.
यजमान गोवा संघाविरुद्ध विजयाने फॉर्मात आलेल्या महाराष्ट्र संघाला आता सलग दुसऱ्या विजयाने उपांत्य फेरीतील प्रवेशाची संधी आहे. यासाठी महाराष्ट्र संघ आज मंगळवारी मैदानावर उतरणार आहे. यादरम्यान महाराष्ट्र आणि जम्मु-कश्मिर संघांत सामना होणार आहे.