मुंबई: मुंबई पश्चिम उपनगरातील जुहू येथील विद्यानिधी शैक्षणिक संकुलात यंदा दिनांक ७ सप्टेंबरली गणेश चतुर्थीला गणेश मूर्तीचे आगमन आनंदी व उत्साही वातावरणात करण्यात आले .पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवात शैक्षणिक संकुलातील वातावरण मंगलमय झाले आहे. गणेशोत्सव साजरा करताना शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर पर्यावरणाचा समतोल राखून पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी विद्यार्थी मनावर बिंबवण्याचे कार्य विद्यानिधी शैक्षणिक संकुलातून अव्याहतपणे केले जात आहे .या उत्सव काळात शाडूच्या मातीच्या मूर्तीची स्थापना केली गेली आहे. बाप्पाची आरास करताना थर्माकोल किंवा प्लास्टिकचा वापर केला गेला नाही. पूर्णपणे पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणपती बाप्पासाठी डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या केदारनाथ मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. ही प्रतिकृती विद्यानिधी वोकेशनल स्टडीज , कमला रहेजा आर्किटेक्चर व व्रजलाल पारेख माध्यमिक इंग्रजी माध्यम यांच्या मदतीने साकारण्यात आली आहे. गणेशोत्सव काळात होणाऱ्या निर्माल्यापासून निर्माल्यशक्ती ही सेंद्रिय खत निर्मिती करून जुहू येथील गृहनिर्माण संस्था व शालेत येणाऱ्या पाहुण्यांना भेट देण्यात येणार आहे. पाचव्या दिवशी होणाऱ्या विसर्जनासाठी शाळेतच लहान कृत्रिम तलाव तयार करण्यात आला आह. गणेशोत्सव काळात विद्यार्थ्यांसाठी विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यासाठी रंगकाम, चित्रकला, शाडूच्या गणेश मूर्ती कथाकथन, श्लोक पाठांतर, नृत्य गायन, आनंदमेळा, आरती थाळी सजावट, मेहंदी, पोस्ट निर्मिती ,कोलाज, रांगोळी, केशशृंगार व आरती गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुदृढ निसर्गाकरीता विद्यानिधी गणपतीचा प्रसाद म्हणून वृक्षाचं बियाणं असलेले मातीचे मोदक भक्तांना देण्याचा उपक्रम विद्यानिधीच्या ज्यूनियर कॅालेज ॲाफ कॅामर्स ने सुरु केला आहे.हे मोदक जमिनीत लावून वृक्षाची निर्मिती व संवर्धन करण्याचं आवाहन हे विद्यार्थी करीत आहेत.
१४ विद्या शाखांमधील विद्यार्थी -पालक गणेशोत्सव काळात विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील कलानिधी बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी येत आहेत. तसेच माजी विद्यार्थी ही दर्शनाला येऊन आरती गायन करत आहेत. उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री, सचिव डॉ. साधना मोढ, कोषाध्यक्ष विनायक दामले आजीवन सदस्य शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, परिसरातील मान्यवर व्यक्ती व विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीमुळे विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील वातावरण गणेशमय झाले आहे.