राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकांचे खाते महाराष्ट्राने उघडले; आर्टिस्टिक जिम्नॅस्टिकमध्ये रौप्य !

३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पणजी : महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील पदकांच्या तालिकेत आज आपले खाते उघडले. त्यांनी महिलांच्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक मध्ये रौप्यपदकाची कमाई केली.

महाराष्ट्र संघाच्या खेळाडूंनी सुरेख पदलालित्य आणि उत्कृष्ट कलात्मक आविष्कार दाखवीत रुपेरी कामगिरी केली. त्यांनी १६६.९५ गुण मिळविले. महाराष्ट्राच्या या संघात श्रद्धा तळेकर, इशिता रेवाळे, शताक्षी ताटके, सृष्टी भावसार, रिद्धी व सिद्धी हातेकर या भगिनी यांचा समावेश होता. या संघास महेंद्र बाभुळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. पश्चिम बंगालने सुवर्णपदक जिंकले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला जिम्नॅस्टिक्स या क्रीडा प्रकारात भरपूर पदकांची अपेक्षा आहे ,त्या दृष्टीने त्यांनी शानदार सुरुवात केली आहे.