महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघ विजयी; दिल्लीवर ७७-४८ ने मोठा विजय

३७वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा

पणजी : आंतरराष्ट्रीय खेळाडू शिरीन लिमयेच्या कुशल नेतृत्वाखाली महाराष्ट्र महिला बास्केटबॉल संघाने मंगळवारी ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये दणदणीत विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने ५ बाय ५ गटातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली संघाला धुळ चारली. महाराष्ट्र संघाने ७७-४८ अशा फरकाने सामना जिंकला. सलामीच्या सामन्यातील पराभवातून सावरलेल्या महाराष्ट्र संघाने गटातील दुसरा सामना जिंकला. यासह संघाच्या नावे गटात दोन सामन्यात प्रत्येकी एका विजय आणि पराभवाची नोंद झाली.

संघाला विजयी ट्रॅकवर आणण्यासाठी कर्णधार शिरीन पाठोपाठ दुर्गा धर्माधिकारी, सिया देवधर, लक्ष्मी प्रिया, गायत्री यांनी सर्वोत्तम कामगिरी केली. यामुळे महाराष्ट्र संघाला सामन्यात दमदार सुरुवात करता आली. यातून संघाने आघाडी कायम ठेवत सामना आपल्या नावे केला. मुख्य प्रशिक्षक निझार यांच्या मार्गदर्शनाखाुली संघाने सामन्यात दर्जेदार खेळी केली. यामुळे महाराष्ट्र महिला संघाला विजयाने स्पर्धेत दमदार पुनरागमन करता आले.