मराठी पाऊल पडते पुढे…तमिळींच्या स्वयंपाकगृहात मालवणी खाद्यपदार्थ!

चेन्नई:आपल्याला मुंबई-महाराष्ट्रात जगभरातील खाद्यपदार्थांची रेलचेल पाहण्यास मिळते. अनेक खाद्य-संस्कृती, परंपरा आपण स्वीकारत असल्याने जिभेवर रेंगाळणारे अद्भुत चवदार पदार्थ महाराष्ट्रात उपलब्ध होत असतात. परंतु आपले मराठमोळे खाद्य पदार्थ इतर राज्यात अभावानेच चाखायला मिळतात. नुकताच तमिळनाडूतील ‘रेन ट्री’ या चेन्नईतील प्रसिद्ध पंचतारांकित रेस्तराँमध्ये आपल्या मालवणी खाद्यपदार्थांचा ७ दिवसांचा खाद्यमहोत्सव आयोजित करून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा सन्मान केला आहे. महाराष्ट्रासाठी आणि खासकरून कोकण-मालवणसाठी अभिमानाची गोष्ट असून मुंबई – मालवण येथील ‘चैतन्य’ या अस्सल मालवणी खाद्यगृहाच्या सुरेखा वाळके आणि नितीन वाळके, सायली वाळके, प्रथमेश कुलकर्णी यांना हे श्रेय जाते. मालवणी खाद्य पदार्थांचा नुसता महोत्सव न करता आपले पदार्थ कसे बनवावेत? आणि कसे सर्व्ह करावेत? याचे प्रशिक्षणही तेथील प्रशिक्षित शेफना देऊन ते तमिळींना मालवणी पदार्थांचा लळा लावण्यात यशस्वी झाले आहेत.

मालवण ते मुंबई असा प्रवास करत घरगुती जेवणाला अस्सल मालवणी ते Authentic Malvani Cuisine अशी ओळख निर्माण करण्यापर्यंतची मजल सुरेखा वाळके आणि नितीन वाळके या खाद्यप्रेमी दाम्पत्याने मारत ‘चैतन्य’ची ३० वर्षांपूर्वी स्थापना केली. आज यात एक नाविन्यपूर्ण गोष्टीची भर पडली आहे. चेन्नईच्या ‘रेन ट्री’ हॉटेलमध्ये तमिळ खाद्यप्रेमींसाठी आपल्या अस्सल चवीच्या मालवणी खाद्यपदार्थांच्या खास रेसिपी या महोत्सवात चैतन्य ग्रुपच्या वाळके परिवाराने सादर तर केल्याच परंतु तेथील प्रशिक्षित शेफना आपले पदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षणही दिले. एक आठवडाभर संपन्न झालेल्या या महोत्सवाला खाद्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला. तमिळींनी नुसते आपले खाद्य पदार्थच स्वीकारली असे नसून त्यांनी आपल्या संस्कृती आणि परंपरेबद्दलही कमालीचा आदर असल्याचे दिसून आले.

द टेस्ट ऑफ मालवण (The Taste of Malvan) या सध्या सुरु असलेल्या सात दिवसांच्या या मालवणी खाद्य महोत्सवामध्ये POP-Up पद्धतीच्या कार्यक्रमात सेट मेनू म्हणजेच थाळी व बुफे अशा दोन्ही तऱ्हेने चेन्नईचे खाद्य रसिक मालवणी जेवणाचा आस्वाद घेत होते. मालवणी मसाल्यातील बटाटे वडे ते ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी ते माश्याच तिखलं, आमटी, भाजलेले मासे, भरलेले पापलेट, कोळंबी भात ते चिकन सागोती, वडे, भाकरी आणि मालवणी जेवणाची भैरवी सोलकढी अशी रेलचेल असलेलं चविष्ट पदार्थ खाऊन ते तृप्त झाले. तमिळी अस्सल खवय्यांचा मिळालेला प्रतिसाद मालवणी खाद्यपदार्थांचा लौकिकार्थाने सन्मान वाढवत असून परराज्यातील खवय्यांना तृप्त करण्याची ‘चैतन्य’ला संधी प्राप्त झाली हा अनुभव परकाया प्रवेशासारखा होता असे सुरेखा वाळके सांगतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *