मुंबई:’मराठी ही ज्ञानभाषा झाली आणि सर्व क्षेत्रातले ज्ञान मराठी भाषेतून दिले गेले, तरच मराठी भाषा टिकेल’ असे मत ज्येष्ठ माध्यमकर्मी नीतीन केळकर यांनी मुंबई विद्यापीठाच्या मराठी पत्रकारिता वर्गाच्या कार्यक्रमात व्यक्त केले. मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेचा मराठी पत्रकारिता वर्ग आणि अखिल भारतीय साहित्य परिषद कोकण प्रांत यांच्या संयुक्त उपक्रमांतर्गत रविवार दिनांक २५ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यानिमित्त नीतीन केळकर यांनी प्रसारमाध्यमांच्या भाषेविषयी विद्यार्थ्यांंना मार्गदर्शन केले.
मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांंना प्रमाण लेखनाचे महत्त्व समजावून देण्यासाठी कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सकाळ वृत्त समूहाचे वरिष्ठ उपसंपादक वैभव चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाण मराठी लेखन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यांनी शुद्ध लेखनाचे महत्त्व सांगत प्रमाण मराठी लेखनाचे नियम विद्यार्थ्यांना रंजक पद्धतीने शिकवले. प्रसारमाध्यमांमध्ये मराठी भाषेचा वापर अधिक विवेकीपणे आणि जागरूकतेने होण्यासाठी भावी पत्रकारांनी सतत जागरूक असले पाहिजे, त्यासाठीच अशा भाषाविषयक उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत मराठी पत्रकारिता वर्ग समन्वयक नम्रता कडू यांनी व्यक्त केले. या उपक्रमानंतर मराठी भाषा विषयक उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली . ही कार्यशाळा आणि वक्तृत्व स्पर्धा सर्वांसाठी खुली असल्याने इतरही महाविद्यालयातील विद्यार्थी यासाठी उपस्थित होते. उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक क्रमांकाचे पारितोषिक वनश्री राडये यांना,द्वितीय क्रमांक सलमान पठाण यांना, तृतीय क्रमांक प्रदीप जानकर यांना मिळाले, तर उत्तेजनार्थ पारितोषिक सिद्धा भोसले आणि अद्वैता कडू यांना देण्यात आले. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या वतीने विजेत्यांना रोख बक्षिसे आणि उपस्थित सर्व स्पर्धकांना काव्य संग्रहाचे वाटप करण्यात आले.
अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण देशमुख, मंत्री संजय द्विवेदी, सदस्य संदीप कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनश्री राडये आणि रोहित जाधव यांनी केले.