मुंबई : मुंबईतील दादर परिसरात गेल्या काही दशकांमध्ये घडलेल्या दिग्गजांचा सन्मान करणारी दिवाळी संध्या छत्रपती शिवाजी पार्क समोरील महात्मा गांधी जलतरण तलाव येथे आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दादरचा समृध्द सांस्कृतिक इतिहास अधोरेखित केला जाणार आहे. सोमवारी दिनांक १३ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ६:३० वाजता रसिकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.
खासदार राहुल शेवाळे यांच्यासह मर्क्युरी इव्हेंट आणि मनसा यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रसिद्ध संगीतकार कमलेश भडकमकर करणार असून उत्तरा केळकर, स्वप्निल बांदोडकर, मुग्धा वैशंपायन, स्वरा जोशी,अजित परब, शरयू दाते, शाल्मली सुखटणकर, मयूर सूकाळे, आर्चिस लेले, वरद कठापूरकर, सत्यजित पाध्ये, सीमा देशमुख असे नावाजलेले कलाकार यात सहभागी होणार आहेत. दादरमध्ये घडलेले दिग्गज कलाकार आणि त्यांचा सांगीतिक प्रवास अधोरेखित करणारा हा कार्यक्रम दादरच्या रसिकांसाठी विनामूल्य असून त्यासाठी मोफत प्रवेशिका वितरित करण्यात आल्या आहेत.