डोंबिवली:एका गरीब लेखकाच्या आयुष्यातील आशा-निराशेच्या हेलकाव्यावर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पेन किलर’ या लघुपटाचा मुहूर्त डोंबिवली येथे दसऱ्याचे औचित्य साधून या निर्माते व प्रमुख कलावंत शशिकांत गांगण यांच्या कार्यालयात अभिनेता भूषण कडू यांच्या हस्ते संपन्न झाला. या लघुपटातील सर्वच कलावंत व त्यासाठी काम करणारे तंत्रज्ञ यांची यामागे चांगली मेहनत असून आपणासही यात एक छोटी भूमिका करायला मिळत आहे, याचा आनंद असल्याचे भूषण कडू यांनी यावेळी सांगितले.
गरीब, परंतु स्वाभिमानी असलेली या लेखकाची आजारी पत्नी, परिस्थितीमुळे मजबूर झालेल्या लेखकाची अगतिकता आणि चांगला शेवट असे दिनेश रुके लिखित ‘पेन किलर’ लघुपटाचे वैशिष्ट्य आहे. या लघुपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून अविनाश नामजोशी जबाबदारी सांभाळीत आहेत. दिग्दर्शन एम नटराज व कृष्णा देडे यांचे असून त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सोहन कांबळे काम पाहत आहेत. शशिकांत गांगण यांच्या समवेत काम करणाऱ्या मुख्य अभिनेत्रीची निवड लवकरच केली जाणार आहे. अन्य भूमिकांमध्ये एम नटराज, आशिष सातपुते, कृष्णा देडे, सोहन कांबळे, अविनाश नामजोशी हेही दिसणार आहेत. या लघुपटाचे छायाचित्रण डोंबिवली येथील विविध स्थळांवर केले जाणार असूनचे ती दिवाळीच्या सुमारास प्रदर्शित केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.