मुंबई: दोन घडीचा डाव ,याला जीवन ऐसे नाव या पंक्तीप्रमाणे मानवी जीवन विनाशाश्वतीचे आहे. कधी काही होईल हे अकल्पनीय आणि अव्यक्त. आजच्या धावपळीच्या काळात तब्बल तीस वर्षांनंतर महाविद्यालयात शिक्षण घेतलेले ९ मित्र पुन्हा आपुलकीच्या ओढीने मुक्कामी भेटून रात्र जागून गप्पांमध्ये घालवतात हे विलक्षण आहे. वर्ष १९९४ ला बारावी उत्तीर्ण झालेले फलटण येथील मुधोजी काॅलेजचे ९ मित्र निवांत वेळ काढून पुण्याजवळील श्री जी ११अँग्रो पार्क येथे शनिवार दिनांक ३०नोव्हेंबरला सुनियोजित वेळ काढून भेटले.
आधुनिक तंत्रज्ञान आणि समाजमाध्यमाच्या आभासी दुनियेत मित्रांची संख्या ही हजारोंच्या घरात असली, तरी त्यात मैत्रीचा निखळ मृदुगंध नाही. वैयक्तिक प्रपंच आणि जबाबदाऱ्या सांभाळताना वयाच्या पन्नासीच्या उंबरठ्यावर आपण कधी पोहोचले हे ही समजत नाही. शरीर साथ देत आहे तोपर्यंतच आपल्या मनातील कुप्पीत असलेल्या मित्रांना भेटायचे याचे ठरवून डॉ. उत्तम शिंदे, मोहन वाघ, संतोष पवार, चक्रधर महामुनी,बाबुराव मुळीक,प्रवीण पाटील,राजू जाधव, तानाजी जाधव व सागर पोतदार यांनी एक महिन्यापासून सर्वांना योग्य व सोयीच्या ठिकाणी भेटण्याचे ठरवले.
दिनांक जवळ येत आहे, हे पाहून भेटण्यासाठी उतावीळ मित्र सुक्ष्म नियोजनास लागले. मुक्कामाचे ठिकाण, मनोरंजन , खेळ, शेकोटी आणि गप्पांसाठी वेळ नियोजन झाले. पुण्यातील ६मित्रांनी सर्व नियोजनाची धुरा यशस्वी सांभाळली.
३० नोव्हेंबरला दुपारी मुधोजी कॉलेज क्रिकेट प्रिमियम लीगचे आयोजन, संध्याकाळी मनमोकळ्या गप्पा, रात्री सुरुची जेवण, शेकोटीबरोबर गीत गायन आणि नृत्य यात रात्र कधी संपून गेली तेच समजले नाही.आज सर्व मित्र आपल्या क्षेत्रात अनुभवी व प्रतितयश म्हणून प्रसिद्ध आहेत. ३०वर्षापूर्वी तारुण्याच्या ऐन उंबरठ्यावर पदार्पण करणारे ते युवक आज पन्नासीच्या पूर्व संध्येतही मैत्रीचे विश्व विस्तृत आणि समृद्ध करणारे आहेत. आज आठवणीत राहणारी मोजकीच नाती पाहायला मिळतात , काही कालपरत्वे धूसर विस्मृतीत जातात परंतु घट्ट वीण असणारे निस्वार्थी, विश्वासाचे, आपुलकी-आपलेपणाचे पवित्र मैत्रीचे नाते नऊरत्नांनी जपून ठेवले आहे.