मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे यावर्षी २ जूनला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला ३५० वे वर्ष असून ते दिमाखाने साजरे करण्यात येत आहे. यासाठी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समितीच्या वतीने दुर्गराज रायगड ही संस्थाही तिथे गेल्या अनेक वर्षांपासून हा सोहळा साजरा करत आहे. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी खास पालखीची मागणी केली आणि त्यांना ती पालखी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी दिली. चांदीच्या पत्र्याने सुशोभित केलेल्या या पालखीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्याभिषेक दिनी किल्ले रायगडावर नेले जाणार आहे.
मंगळवारी ३० मे २०२३ या दिवशी ही पालखी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यासमोर सादर करून शिवरायांचा, संभाजी महाराजांचा, सावरकरांचा जयजयकार करीत सादर केली आणि त्या ठिकाणी पालखीमध्ये छत्रपती शिवरायांची प्रतिमा ठेवून यथासांग पूजा करून छत्रपतींचा जयजयकार करण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की, ‘ आम्ही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे या पालखीची मागणी केली. गेली अनेक वर्षे संस्थेच्या पुढाकाराने रायगडावर शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा केला जातो. यावेळी ३५० वे वर्ष या दिवसाचे असून त्या निमित्ताने केलेल्या मागणीला मुनगुंटीवार यांनी मान्य करून ही पालखी तयार करून दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहाणारे भक्तच होते, अशा या स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकापुढे आम्ही अभिमानाने ही पालखी सादर केली आहे. छत्रपती शिवरायांसाठी असे काम केलेल महाराष्ट्रातील हे पहिलेच सरकार असेल.’
यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी पालखी आणि त्यातील शिवछत्रपतींच्या प्रतिमेचे पूजन केले तसेच कार्यवाह राजेंद्र वराडकर, सह कार्यवाह स्वप्निल सावरकर यांनी पालखी वाहून नेण्याचा प्रातिनिधीक अभिमानास्पद असा मानही भक्तिभावाने स्वीकारला. स्मारकाचे कर्मचारी, सदस्यही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच समितीचे कार्यकर्ते, पदाधिकारीही यावेळी होते. पालखीवर छत्र धरून भगवा झेंडा फकावत अतिशय भक्तिभावाने पालखीचे स्वागत केले गेले.
महाराष्ट्र सरकारनेही यासाठी खास पुढाकार घेतला असून त्यासाठी सर्व प्रशासनही तेथे येणाऱ्या शिवाजी महाराजांच्या लाखो मावळ्यांचे स्वागत करण्यास सज्ज झाले आहे. लाखो मावळे यावेळी रायगडावर येतील मात्र एक लाख लोक येऊ शकतील अशी जागा तिथे नाही, कडाक्याचे ऊनही आहे तेव्हा राज्यातील विविध गावांमध्ये गुढीपाडव्याप्रमाणे लोकांनी गुढ्या ध्वज उभारून शिवपाडवाच या दिवशी साजरा करावा असेही आवाहन यावेळी सुनील पवार यांनी केले. यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.