मुंबई : रंगभूमीची मध्यवर्ती संघटना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित, नाट्य संस्कृती लाभलेल्या महाराष्ट्र राज्यात मानाचे शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन जानेवारी ते मे २०२४ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने मोठ्या स्वरूपात आणि धुमधडाक्यात साजरं होणार आहे. या संमेलनाचा महत्वाचा भाग महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातील कलावंत, नाट्यकर्मींसाठी ‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव दिनांक १५ जानेवारी २०२४ पासून सुरू होणार असून या स्पर्धांमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व कलावंतांनी भाग घ्यावा, असे आवाहन नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी केले आहे.
‘नाट्यकलेचा जागर’ हा स्पर्धात्मक महोत्सव महाराष्ट्रातील विविध २२ केंद्रांवर रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर, बीड, नांदेड, लातूर, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, ठाणे, नवीमुंबई , मुंबई इथं होणार आहे. यात एकांकिका स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, एकपात्री स्पर्धा, नाट्य अभिवाचन स्पर्धा, नाट्यछटा स्पर्धा, नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा प्राथमिक, उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. १५ जानेवारी पासून प्राथमिक फेरी सुरू होऊन यातील निवडक कलाकृतींची उपांत्य फेरी घेण्यात येणार आहे आणि त्यानंतर मुंबई येथे अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीत निवड झालेल्या कलावंतांसाठी ४ दिवसीय नाट्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. हे शिबिर नाट्यक्षेत्रातील दिग्गज दिग्दर्शक,अभिनेते,अभिनेत्री घेणार असून अंतिम फेरीतील सादरीकरणाचा दर्जा यामुळे सर्वोत्तम असणार आहे.
व्यावसायिक कलावंतांबरोबर प्रथमच महाराष्ट्रातील सर्व गुणवंत कलाकारांना १०० व्या नाट्यसंमेलनात आपली कला सादर करण्याची संधी या नाट्यकलेचा जागरमधून मिळणार आहे.
स्पर्धेची रोख पारितोषिके
एकांकिका स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २,००,०००/- (खास स्पर्धेसाठी लिखाण केलेल्या एकांकिकेस) अथवा सर्वोत्कृष्ट १,००,०००/-, उत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्तम रू. ५०,०००/-, दोन उत्तेजनार्थ पारितोषिके रू. २५,०००/-
बालनाट्य स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. ७५,०००/-, उत्कृष्ट रू. ५०,०००/-, उत्तम रू. २५,०००/-, तर तीन उत्तेजनार्थ रू. १०,०००/-
नाट्य अभिवाचन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-
नाट्यसंगीत पद गायन स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. २५,०००/-, उत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्तम रू. १०,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. ५,०००/-
एकपात्री / नाट्यछटा स्पर्धा – सर्वोत्कृष्ट रू. १५,०००/-, उत्कृष्ट रू. १०,०००/-, उत्तम रू. ५,०००/-, दोन उत्तेजनार्थ रू. २,५००/-
लेखन/दिग्दर्शन/नेपथ्य/प्रकाश योजना/पार्श्वसंगीत/स्त्री अभिनय/पुरूष अभिनय वैयक्तिक रोख पारितोषिके (एकांकिका स्पर्धेसाठी) रु. १५,०००/-, रु. १०,०००/- , रु. ५०००/- व स्मृतीचिन्ह. बालनाट्य स्पर्धेसाठी रु. ७५००/-, रु. ५०००/-, २५००/- देण्यात येणार आहेत.
तसंच या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला देखील भरघोस अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी कलावंत , तंत्रज्ञ यांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. एकांकिकेसाठी प्रवेश फी रू. १०००/- तर बालनाट्यासाठी रू. ५००/- व इतर सर्व स्पर्धांसाठी रू. १००/- राहील.
या सर्व स्पर्धांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनंच होणार असून www.natyaparishad.org संकेतस्थळावर विविध स्पर्धांची माहिती आणि नियामवली उपलब्ध आहे. स्पर्धेचे प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची दिनांक ३१ डिसेंबर २०२३ असून वेळ सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत आहे. त्यानंतर आलेल्या प्रवेशिका स्वीकारल्या जाणार नाहीत. या स्पर्धेत जिल्ह्यातल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, कलावंतांनी, शाळा, संगीत विद्यालय, महाविद्यालय, हौशी संस्थां, विद्यापीठाच्या आणि इतर महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाट्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.