‘२३ वा पार्ले महोत्सव’ २३ ते ३० डिसेंबर २०२३ दरम्यान रंगणार !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार ‘२३ व्या पार्ले महोत्सवाचं उद्घाटन; ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सहभागी होणार ३० हजार स्पर्धक…

मुंबई :मुंबईतील सर्वात मोठा महोत्सव म्हणजे ‘पार्ले महोत्सव’. यंदाच्या २३ व्या पार्ले महोत्सवाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक २३ डिसेंबरला होणार असून मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि खासदार पूनम महाजन विशेष अतिथी म्हणून उपस्थित असतील, असे महोत्सवाचे प्रमुख आयोजक आणि आमदार पराग अळवणी यांनी सांगितले आहे.

२३ व्या पार्ले महोत्सवात एकूण ३२ प्रकारच्या स्पर्धा घेण्यात येतील. यातील विविध वयोगट धरून ३९२ प्रथम पारितोषिकांसह २हजार ५०० पारितोषिके प्रदान करण्यात येतील. दिनांक २३ ते ३० डिसेंबर २०२३ पर्यंत चालणारा हा महोत्सव विलेपार्लेमधल्या वामन मंगेश दुभाषी मैदान, पार्ले टिळक विद्यालय, साठ्ये महाविद्यालय, सहार गाव मैदान अशा विविध ठिकाणी संपन्न होईल. सातत्याने २३ वर्ष आयोजित होत असलेल्या पार्ले महोत्सवातील ३२ प्रकारच्या स्पर्धांमधून सुमारे ३० हजार स्पर्धक भाग घेणार आहेत. तर या महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी ८०० पेक्षा अधिक कार्यकर्ते आहेत. प्रेक्षकांसाठी भव्य स्टेडीयम उभारलेल्या वामन मंगेश दुभाषी मैदानास कबड्डी क्षेत्रातील जाणते कार्यकर्ते कै. शंकर मोडक क्रिडा नगरी, कला विभागातील स्पर्धा होत असलेल्या साठ्ये महाविद्यालयाला प्रसिद्ध अभिनेते कै. के. डी. चंद्रन नगर तर नृत्य स्पर्धा संपन्न होणाऱ्या पार्ले टिळक शाळा परिसरात जेष्ठ आणि श्रेष्ठ अभिनेत्री चित्रमाऊली कै. सुलोचना दीदी नगर असं नाव देण्यात येणार आहे.

सातत्याने यशस्वीपणे होत असलेल्या या पार्ले महोत्सवाच्या आयोजन समितीमध्ये श्रीकृष्ण आंबेकर, विनीत गोरे ,मिलिंद शिंदे ,विलास करमळकर, एन. सुरेशन, प्रवीर कपूर, राजेश मेहता अशी मंडळी असून माजी नगरसेविका ज्योती अळवणी, सुनिता मेहता, माजी नगरसेवक अनिष मकवानी आणि अभिजीत सामंत यांचाही सहभाग आहे.