मुंबईत यंग चेंज मेकर्स ऑफ द सिटी – ‘द सोशल लीडर समिट’ चे आयोजन…

मुंबई:तरुणांमध्ये बदल घडविण्याची अफाट क्षमता असते. त्यांना योग्य माणसं आणि योग्य वाटा सापडल्या की ते उन्नत असं समाजाभिमुख कार्य करू शकतात. ही बाब दर्शविणारा कार्यक्रम नुकताच ‘यंग चेंज मेकर्स ऑफ द सिटी – द सोशल लीडर समिट’ येथे पाहायला मिळाला.  द ब्लू रिबन मूवमेंट यांनी अपनालय, युवा, स्नेहा, प्रजा आणि पुकार या संस्थांच्या सहकार्याने वायएमसीए(YMCA) इंटरनॅशनल हाऊस, मुंबई सेंट्रल येथे या सोशल लीडर्स समिटचे आयोजन केले होते.

आजची तरुण पिढी बिघडत चालली आहे. सामाजिक जाणिवा त्यांच्या संपत चालल्या आहेत, अशी एका बाजूला ओरड असताना सामाजिक परिवर्तनाची ज्योत अंगिकारलेल्या १२० हून अधिक युवकांनी या समिटमध्ये सहभाग नोंदविला होता. ही तरुण मंडळी आरोग्य, शिक्षण, नागरिक हक्क, पर्यावरण यांसारख्या अनेक सामाजिक विषयांमध्ये आपल्या सामाजिक जाणिवेतून उत्तम असे कार्य करत आहेत. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा या सामाजिक क्षेत्रातल्या तरुण तेजांकितांना एकत्र आणून, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हा होता.

या कार्यक्रमाची सुरुवात विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या व्यक्तींच्या चर्चासत्राने झाली. ही मंडळी मागील अनेक वर्षांपासून आपल्या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी या सत्रात सामाजिक क्षेत्रात काम करताना येणाऱ्या अडचणी, त्यावर काढलेला मार्ग आणि या कार्यातून निर्माण झालेला एक समाजातला आजचा सकारात्मक बदल यावर भाष्य केेले. या क्षेत्रातील अनुभव मांडताना त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान व्यक्त करताना अनेकजण भावूक झाले.

त्यानंतरच्या सत्रात युवा परिवर्तनकर्त्यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यामध्ये अनेक तरुण तेजांकितांनी आपल्या सामाजिक बदलाचा प्रवास आणि त्यामागील प्रबळ भावना मांडली. ब्लू रिबन मूवमेंटचे संस्थापक आणि या कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे अभिषेक ठाकोर युवांचं नेतृत्व करताना म्हणाले…”मुंबईतील प्रमुख युवा संस्थांचे अशाप्रकारे एकत्र येणे, हे मुंबईतील युवा चळवळींची ताकद आणि एकात्मता दर्शवते. आम्ही याद्वारे सिद्ध करून दाखवले आहे की मुंबईत कोणीही तरुण व्यक्ती उदासीन नाही. अशा कार्यक्रमांमुळे उच्च क्षमता असलेल्या तरुणांना एकत्र आणून, नव्या उपक्रमांची आणि प्रकल्पांची खऱ्या अर्थाने सुरुवात होते, ज्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास होण्यात हातभार लागतो. यानंतर मुंबईच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या शरथ साळियन आणि चांदणी पारिख या तरुण युवकांच्या सामाजिक कार्याचा गौरव ‘ आय केअर (iCare) पुरस्कार ‘ देऊन सन्मान करण्यात आला.

तसेच ब्लू रिबन मूवमेंटद्वारे आयोजित तीन महिन्यांच्या कम्युनिटी कनेक्ट फेलोशिप (CCF) पूर्ण करणाऱ्या २४ महाविद्यालयीन युवा परिवर्तनकर्त्यांचा सन्मानदेखील या कार्यक्रमात केला गेला. या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शहरात बदल घडविण्यासाठी आपला वेळ समर्पित करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे खड्डे दुरुस्तीचा सरासरी वेळ ५४ दिवसांवरून १०-१२ दिवसांपर्यंत कमी करण्याच्या याचिकेवर ७५०+ पेक्षा जास्त सह्या गोळा झाल्या. याव्यतिरिक्त, त्यांनी ३४ नागरी तक्रारी नोंदवल्या, ज्यापैकी १२ तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत.

शहरातील समविचारी तरुण तेजांकितांना अशा समिटच्या माध्यमातून एकत्र आणल्यामुळे अनेकांनी कार्यक्रमाच्या आयोजकांचे आभार मानले. तर समविचारी तरूणांच्या अशा पद्धतीत एकत्र येण्याने शहरातील अनेक सामाजिक कामांची नांदी या कार्यक्रमामुळे रोवली गेल्याचे दिसून येत आहे.