मुंबई: विद्यानिधी संकुलाताल शिकणाऱ्या चौदा विद्या शाखांतील विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ढोल ताशांच्या गजरात, देशभक्तीपर गीत गात, राष्ट्रभक्तीच्या घोषणा देत जुहू परिसरात प्रभात फेरी काढली. प्रभात फेरीतील घोषणांनी सर्व परिसर राष्ट्र प्रेमाच्या भावनेने भारावून गेला. जुहू परिसरातील रामकृष्ण सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य व रोटेरियन नितीन सोमय्या आणि अराईज जुहू सिटीझन्स या संस्थेच्या मान्यवरांनी प्रभात फेरीचे स्वागत केले.
विद्यानिधी शैक्षणिक संकुलात प्रजासत्ताक दिनानिमित्ताने माजी राष्ट्रपती भारतरत्न ए. पी.जे .अब्दुल कलाम यांचे पूर्व नियंत्रक कर्नल अशोक केणी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. विद्यानिधी शैक्षणिक संकुलात मुलांच्या अंगचे कलागुण पाहून मी मंत्रमुग्ध झालो. आपल्या देशाला विश्वगुरू करण्यासाठी प्रत्येकाने अविरत प्रयत्न केले पाहिजेत असे विचार त्यांनी व्यक्त केले. उपनगर शिक्षण मंडळाच्या वतीने वर्ष २०२५ चा वारद पुरस्कार वीरमाता अनुराधा गोरे यांना संस्थेचे उपाध्यक्ष रमेश भाई मेहता यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले . या कार्यक्रमाला उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सत्यनारायण काबरा, कार्याध्क्ष संजीव मंत्री, सचिव डॉ. साधना मोढ प्रमुख पाहुणे. कर्नल अशोक केणी हे मान्यवर उपस्थित होते. तुमची शाळा खरंच वेगळी आहे. भारतीय संस्कार देणाऱ्या मोजक्या शाळातील अग्रगण्य ही संस्था आहे. देशात आज अनेक समस्या असल्या तरी त्यातील कोणती समस्या सोडवण्यास माझा हातभार लागू शकतो, याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. असा सुसंवाद त्यांनी विद्यार्थ्यांशी साधला.
शैक्षणिक वर्ष २०२५ हे वर्ष उपनगर शिक्षण मंडळातर्फे ‘विरासत से विकास ‘ या आशयाने साजरे केले जात आहे. त्यामुळे गणतंत्र दिनाच्या कलादर्पण कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना गोंधळ गीतातून मानवंदना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी नृत्य ,गायन, भाषण, लाठीकाठी मल्लखांब प्रात्यक्षिके यांच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. तिन्ही सैन्य दलाच्या कार्याची झलक नाटिकेतून सादर केली गेली. मान्यवरांच्या हस्ते विद्यानिधी शैक्षणिक संकुलातून यावर्षी सेवानिवृत्त झालेले कर्मचारी तसेच सेवेची २५ वर्षे पूर्ण केलेले शिक्षक शिक्षकेतेर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला. उपनगर शिक्षण मंडळाच्या प्रथेप्रमाणे विद्यानिधी आर्किटेक्चर कॉलेज व कूपर रुग्णालय यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यमाला आजीव सदस्य, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि जुहू परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष टक्के व प्रेम किशोर मिश्रा यांनी केले.