शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अमेरिका दौरा

मुंबई : परदेशी स्थायिक असलेल्या मराठीजनांची आपल्या मराठी संस्कृतीशी असलेली नाळ अधिक घट्ट व्हावी, यासाठी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. या उपक्रमासाठी महाराष्ट्रातील अनेक मान्यवरांचे सहकार्य लाभत असते. अशाच एका उपक्रमासाठी प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी पुढाकार घेतला आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या शैक्षणिक निधी उभारणीसाठी ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ आणि ‘नियम व अटी लागू’ या दोन नाटकांचा अमेरिका दौरा त्यांनी आयोजित केला आहे. ८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान ‘नियम व अटी लागू’ चे प्रयोग तर ३० सप्टेंबर ते १५ ऑक्टोबर दरम्यान ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचे प्रयोग अमेरिकेत होतील. या दोन नाटकांचे २१ कलाकार ६ आठवड्यात २१ प्रयोग सादर करणार आहेत. या प्रयोगांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा हिस्सा बृहन्महाराष्ट्र मंडळ शैक्षणिक निधी उभारणीसाठी देण्यात येणार आहे. त्यातून २०२३ मध्ये १३-१८ वयोगटातील १०० मुलामुलींसाठी $३०,००० आणि २०२४ मध्ये ५०० मुलामुलींसाठी अंदाजे $१५०,००० असा $२ मिलीयनचा फंड उभारण्याचा बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांचा मानस आहे.

मराठी अमेरिकेन मुलांचे मराठीशी नाते अतूट राहावे, या उद्देशाने बृहन्महाराष्ट्र मंडळ हा नवीन उपक्रम राबवत आहे. या उपक्रमासाठी प्रशांत दामले आणि त्यांच्या टीमचा हातभार लागणे ही सर्व उत्तर अमेरिकेतील मराठी समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट असल्याचे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष संदीप दीक्षित यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल बोलताना प्रशांत दामले सांगतात, ‘कलावंत हा कलाकेंद्री असलाच पाहिजे पण त्याला सामाजिक भानही असायलाच हवे’, माझे आणि बृहन्महाराष्ट्र मंडळाचे पूर्वापार अतिशय स्नेहाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. कोविड काळात बृहन्महाराष्ट्र मंडळाने आमच्या रंगमंच कामगारांसाठी स्वतःहून मदतीचा हात पुढे केला होता. आणि आता या अतिशय महत्त्वपूर्ण उपक्रमात मला आणि माझ्या टीमला सहभागी करून घेतल्याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे.