स्नेहज्योती अंधशाळेमध्ये पुस्तक प्रकाशन आणि आवश्यक चीजवस्तूंचे वाटप

नवी मुंबई: दैनिक ‘नवे शहर’चे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्या ‘गणपती, गीते आणि गानरसिक’व‘शिकण्याचं वय’ या ब्रेल लिपीतील चोवीसाव्या आणि पंचविसाव्या पुस्तकांचे प्रकाशन पंचनदी, दापोली येथील ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार, संगीतकार इकबाल शर्फ मुकादम यांच्या हस्ते २३ जून रोजी करण्यात आले. याचवेळी नवी मुंबई महापालिका सचिव चित्रा बाविस्कर यांच्या ‘राष्ट्रीय सण’ व ‘भारतीय सण’ या सतराव्या आणि अठराव्या पुस्तकांचे प्रकाशनही मुकादम यांच्या हस्ते पार पडले.

स्नेहज्योती अंध निवासी विद्यालय, घराडी, मंडणगड, जिल्हा रत्नागिरी येथे या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र घरत लिखित ‘मुशाफिरी’ या दै. आपलं नवे शहर मधून गेली पंचवीस वर्षे प्रसिध्द होत असलेल्या लेखमालेतील निवडक लेखांचा समावेश त्यांच्या या दोन पुस्तकांत करण्यात आला आहे. सदर प्रसंगी आपले विचार मांडताना मुकादम म्हणाले की ब्रेल लिपी, रेकॉर्डिंग यामुळे दृष्टीहीनांनाही आता शारीरिक कमजोरीवर अंशतः विजय मिळवून ज्ञान, माहिती मिळवणं सोपं झालं आहे. घराडी येथील ही अंधशाळा व आपले गाव पंचनदी, दापोली हे जवळ असूनही येथे येण्याची संधी या आधी आपणास आली नव्हती असे सांगून इकबाल मुकादम म्हणाले की श्रीकृष्ण हे आपले आवडते दैवत असून श्रीकृष्ण – राधेवरही आपण गीतरचना केल्या आहेत. या सर्व लेखनाचे ब्रेल रुपांतर या शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सेनगुप्ता यांच्या मेहनतीमुळे दृष्टीहीन मुलांसमोर जात असल्याचा आनंद यावेळी लेखक राजेंद्र घरत यांनी यावेळी आपल्या मनोगतपर भाषणातून व्यक्त केला व आपल्या दिवंगत मातेचेही नाव ‘प्रतिभा’ असल्याने सेनगुप्ता यांच्यात आपण आपली आईच पाहात असून गेल्या पंधरा-सोळा वर्षात केवळ त्यांच्यामुळेच आपली पंचवीस पुस्तके ब्रेलमध्ये येऊ शकली, याबद्दल कृतज्ञता व्यवत केली.

चित्रा बाविस्कर यांनी साहित्य ही मानवी जीवनाची गंगोत्री आणि मनाची मशागत करण्याचा उत्तम स्त्रोत असून साहित्यसेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल आपण स्वतःला कृतकृत्य समजतो अशी भावना भाषणातून मांडली. याप्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी व संगीत शिक्षकांनी विविध गाणी सादर केली. प्रतिभा सेनगुप्ता, स्नेहज्योती संंस्थेच्या अध्यक्ष आशाताई कामत यांनी सर्वांचे स्वागत केले. लेखक घरत, बाविस्कर यांनी यावेळी सोबत नेलेल्या तसेच नवी मुंबईतून व अन्य ठिकाणांहुन काही हितचिंतकांनी पाठवलेल्या शालेय वापराच्या चीजवस्तू, खाऊ, छत्र्या, कपडे, धान्य यावेळी वितरीत करण्यात आले.