सौरभ बनला ‘फौजी’

मुंबई : आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर अभिनेता सौरभ गोखले यांनी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि जाहिरात विश्वात स्वतःच वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या आपल्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा जपत रसिकांना मनमुराद आनंद देणारा हा अभिनेता आता एका जिगरबाज सैनिकाच्या ‘रफ अँड टफ’ भूमिकेत दिसणार आहे. कमांडोच्या वेशातील सौरभचा नवा लूक नुकताच समोर आला आहे. आगामी ‘फौजी’ या मराठी चित्रपटामध्ये एका निडर सैनिकाची भूमिका तो साकारत आहे. मातृपितृ फिल्म्स् प्रस्तुत घनशाम येडे निर्मित आणि दिग्दर्शित ‘फौजी’ देशाचा प्राण, ‘आन बान शान’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘फौजी’ सिनेमाच्या निमित्ताने मला सैनिकाची भूमिका साकारायला मिळाली असून त्यासाठी आवश्यक ते ट्रेनिंग सध्या मी घेत आहे. देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या सैनिकाची भूमिका साकारणं हे माझ्यातील अभिनेत्यासाठी आनंददायी तितकेच आव्हानात्मक आहे, असं सौरभ सांगतो.

अभिनेता सौरभ गोखले यांच्यासोबत प्राजक्ता गायकवाड, नागेश भोसले, शहाबाज खान, अरुण नलावडे, कल्याणी चौधरी, संजय खापरे, अश्विनी कासार, सुनील गोडबोले, हंसराज जगताप, सिद्धेश्वर झाडबुके, रोहित चव्हाण, विवेक चाबुकस्वार, जयंत सावरकर, सुहास गरगडे, विश्वजित बेलदार, संकेत तटकरी, घनशाम येडे हे कलाकार चित्रपटात दिसणार आहेत.

शेतकरी कुटुंबातून आलेल्या आणि स्पॉट बॉय ते निर्माता दिग्दर्शक असा प्रवास करणाऱ्या घनशाम येडे यांनी ‘फौजी’ चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला असून, चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीते घनशाम येडे यांची आहेत. छायांकन मोहन वर्मा तर संकलन विश्वजीत दोडेकर यांचे आहे. साहसदृश्ये मोजेस फर्नांडिस यांची आहेत. ध्वनी अनिल निकम तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. रंगभूषा आमोद दोषी तर वेशभूषा नाशीर खान यांची आहे. निर्मिती व्यवस्थापनाची जबाबदारी महेश चाबुकस्वार यांनी सांभाळली आहे.