ज्येष्ठ पत्रकार अशोक शिंदे यांना कॉ. गुलाबराव गणाचार्य पुरस्कार

मुंबई: पत्रकारितेत गेली ३१ वर्षे कार्यरत असलेले अशोक शिंदे यांना कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक आणि धर्मादाय विश्वस्त संस्थेचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यापूर्वी हे पुरस्कार परेश मोकाशी, प्रताब आसबे, आत्माराम मोरे, विलास मुकादम आदी मान्यवर पत्रकारांना देण्यात आले आहेत.

कॉ. गुलाबराव गणाचार्य स्मारक आणि धर्मादाय विश्वस्त संस्था तसेच ग्रंथाली यांच्या संयुक्त विद्यमाने दादर पूर्व येथील योगी सभागृहात कॉ. गुलाबराव गणाचार्य यांच्या ५० व्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र आणि कामगार नेते अनिल गणाचार्य यांच्या `मी अनिल गणाचार्य’ या पत्रकार अशोक शिंदे यांनी शब्दबद्ध केलेल्या चरित्राचे शानदार प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री आणि राज्यपाल राम नाईक आणि सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रसाद लाड, कामगार नेते विश्वास उटगी, महेंद्र घरत, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी नगरसेवक उपेंद्र दोशी आणि सुनील गणाचार्य, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर आणि धनश्री धारप आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.

अशोक शिंदे हे १९९२ पासून पत्रकारितेत असून सांज लोकसत्ता, नवशक्ती, सकाळ, अर्थनीती, युगधर्म, खबर, विदर्भ पुकार, देश, कर्मचारी टाइम्स आदी विविध वृत्तपत्रांत काम केले आहे. श्रमजीवी आणि सामाजिक विषयावरील बातमीमागील वस्तुनिष्ठता आणि सापेक्षपणा यामुळे भारतीय पत्रकार संघ तसेच अन्य विविध सामाजिक संस्थांकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळावर परिक्षक म्हणून त्यांनी कार्य केले आहे तसेच मुंबई लघुवाद न्यायालयाच्या राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गतदेखील न्यायाधीश म्हणून काम पाहतात. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात त्यांनी प्रसिद्धी समितीप्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या शिवसेना काल आज आणि उद्या या ग्रंथ निर्मितीतदेखील त्यांनी सहभाग दिला आहे. रामचंद्र प्रतिष्ठान या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून २०१८ पासून ते महाराष्ट्रातील कारागृहांतील बंदिवानांमध्ये देशभक्ती रुजवत असून त्यांचे मानसिक पुनर्वसन करण्यासाठी कार्य करत आहेत. अनेक चरित्रपर पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले आहे तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ग्रंथांचे १२ भारतीय भाषांमध्ये अनुवाद करुन घेण्याच्या प्रकल्पात मोलाचे योगदान दिले आहे.