कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला विद्यार्थी, युवक, नवउद्योजक आणि संशोधकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑक्टोबरच्या मध्यरात्री स्पर्धेची अर्ज प्रक्रिया संपुष्टात आली असून, या स्पर्धेसाठी एकूण १ लाख ७ हजार ६०३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. युवकांच्या नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेने विश्वविक्रमी कामगिरी केली असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र झोनमधून या स्पर्धेसाठी १ लाख ७ हजार ६०३ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये ७९ हजार १६२ संघांचा सहभाग असून, ३२ हजार २९८ स्पर्धकांनी आपले प्रोफाइल पूर्ण केले आहे. तसेच, ६ हजार १९२ महिलांनी आणि १८ वर्षांखालील ४ हजार ५४९ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. सामान्य प्रवर्गातून २१ हजार ५५० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, स्पर्धकांकडून एकूण १६ हजार ५७ नाविन्यपूर्ण संकल्पना सादर करण्यात आल्या आहेत.
या स्पर्धेच्या माध्यमातून कृषी, कायदा आणि सुव्यवस्था, महिला आणि बालकल्याण, नगरविकास, आरोग्य आणि वैद्यकीय सेवा, संरक्षण, शाश्वतता (ऊर्जा, हवामान आणि संबंधित क्षेत्रे), पायाभूत सुविधा व वाहतूक, उदयोन्मुख तंत्रज्ञान (कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन आणि इतर तंत्रज्ञान) तसेच शिक्षण आणि रोजगारक्षमता अशा १० प्रमुख क्षेत्रांतील समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय शोधले जाणार आहेत. प्रत्येक प्रमुख क्षेत्रांतर्गत पाच उपक्षेत्रांचा समावेश असून, अशा एकूण ५० उपक्षेत्रांमधून विजेत्यांची निवड केली जाणार आहे.
या स्पर्धेतील ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे युवकांच्या कल्पनांना केवळ पुरस्कारापुरते मर्यादित न ठेवता, त्यांना प्रत्यक्षात उतरविण्याची संधी मिळणार आहे. युवकांच्या कल्पकतेला योग्य व्यासपीठ, नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि समाजोपयोगी नवकल्पनांच्या अंमलबजावणीला चालना देण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा युवकांच्या कल्पकतेची आणि उद्योजकीय क्षमतेची साक्ष आहे.या स्पर्धेतील ५० विजेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपयांचे, असे एकूण ५ कोटी रुपयांचे कार्यादेश देण्यात येणार आहेत. युवकांच्या कल्पनांना आर्थिक पाठबळ देऊन त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
राज्यातील युवकांना नाविन्यता, उद्योजकता आणि स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात सक्षम करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत सीएम महाफंड योजना, अल्पकालीन अभ्यासक्रम (शॉर्ट टर्म कोर्सेस), नवयुगीन अभ्यासक्रम (न्यू एज कोर्सेस), राज्यस्तरीय समन्वय संस्थालआदी महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.