विद्यानिधी विद्यालयात ‘शिववैभव’ शिवकालीन शस्त्रास्त्र आणि गडकिल्ल्यांचे प्रदर्शन

मुंबई : शिवराज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत आहेत, याचे औचित्य साधून उपनगर शिक्षण मंडळाने ‘शिववैभव’ हे प्रदर्शन त्यांच्या जुहू येथील विद्यानिधी शिक्षण संकुलामध्ये २ ते ४ डिसेंबरला केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून हिंदवी स्वराज्य निर्मिले याचा समाजापुढे आदर्श ठेवून उद्योन्मुख पिढीला राष्ट्राभिमानाची स्फूर्ती मिळावी हा यामागचा उद्देश होता. छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती, शस्त्रास्त्र विद्या आणि शस्त्रास्त्र निर्मीतीमधील त्यांनी केलेले बदल, पत्रव्यवहार आणि त्यातील भाषा या ऐतिहासिक ठेव्यांची माहिती आजच्या पिढीला प्रत्यक्ष दर्शनातून घडावी, आपल्या इतिहासाबद्दल आस्था निर्माण व्हावी आणि हिंदवी शक्तीचा अभिमान वाटावा हा उदात्त हेतू प्रदर्शनामागे होता.

या तीन दिवसांच्या प्रदर्शनात शिवकालीन दुर्मिळ शस्त्रास्त्रे, नाणी, चित्ररूपी गड किल्ले, मोडी लिपीतील कागदपत्रे यांची विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. रांगोळीकार निलेश निवाते यांनी काढलेली शिवराज्याभिषेक रांगोळी ही सर्वांच्या आकर्षणाचा मुद्दा ठरली. प्रदर्शनाच्या उद्घघाटन कार्यक्रमाला उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश भाई मेहता, सचिव डॉ. साधना मोढ, कोषाध्यक्ष विनायक दामले, सदस्य डॅा.सत्यनारायण काब्रा आणि डॅा.किर्तीदा मेहता,बृहन्मुंबई के/पी विभागाचे उपशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे, कूपर रुग्णालयालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. उध्दघाटन कार्यक्रमात विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांनी शिवकालीन नाटिका, शिवगीत, लाठीकाठी, दांडपट्टा तलवारबाजी, अग्निचक्र, लेझीम यांची आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली. समीर गणपती सकपाळ या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांने सादर केलेला पोवाडा सर्वांच्या आकर्षणाचा विषय ठरला. शिक्षिका स्वप्नाली साळवी यांनी रायगडाला जेव्हा जाग येते या ऐतिहासिक नाटकातील एक प्रवेशिका सादर केली.

‘शिवाजी महाराज हे फक्त अभ्यासासाठी न वाचता ती जगण्याची आदर्श कार्यशाळा आहे हे लक्षात घ्यावे असे उद्गगार काढले. आजच्या आधुनिक युगात मुलं आपल्या आई-वडिलांच्या संवादापासून दूर जाऊन मोबाईलच्या जाळ्यात अडकत चालली आहेत. विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील नानाविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी या मोहजालातून बाहेर पडण्यासाठी उपयोगी आहेत. विद्यानिधी संकुलात शिकवले जाणारे मर्दानी खेळ-क्रीडा प्रकार पाहून इतर शाळांनी असेच आदर्शवत उपक्रम राबवावेत, ‘असे मत शिक्षण विभागाचे उपशिक्षण अधिकारी नवनाथ वणवे यांनी व्यक्त केले.

अजिंक्य हायकर्सचे सुनील कदम यांनी विद्यार्थ्यांना शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि त्यांचा वापर याविषयी उत्तम माहिती दिली. दुर्गवीर प्रतिष्ठानचे सुमित जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवकालीन गडकिल्ले यांची चित्ररूप माहिती उपस्थितांना दिली. तीन दिवसांच्या या प्रदर्शनास अंधेरी विभागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी भेट दिली. स्थानिक आमदार अमित साटम, माजी नगरसेविका सुधा सिंग, मुंबई मराठी पत्रकार संघाचे जेष्ठ पत्रकार अजय वैद्य, मुंबई ग्राहक संघाच्या उपाध्यक्षा अनुराधा देशपांडे आणि त्यांच्या सहकारी कार्यकर्त्या, जनकल्याण बँकेचे संतोष रजपूत आणि सहकारी, माजी नगरसेवक मकवानी ,एकल श्रीहरी सत्संग समितीचे अनिल मनसिंगका, जुहू पोलीस ठाण्याचे जाधव, राष्ट्रमुद्राचे संपादक विनित मासावकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य, विभागातील रहिवाशी आणि विद्यानिधी शैक्षणिक संकुलाच्या माजी विद्यार्थी आणि पालकांनी प्रदर्शनाला भेट देऊन या सुवर्णसंधीचा लाभ घेतला. उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निवेदन शिक्षिका सुष्मिता पाटील आणि सीता पाल यांनी केले.