मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?

मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो गोरगरीब गरजू रुग्णांना सढळ हस्ते मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाद्वारे अवघ्या सहा महिन्यांत २ हजार ६०० रुग्णांना एकूण १९ कोटी ४३ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या दिवसापासून या योजनेचे मूळ संकल्पक – कक्ष प्रमुख मंगेश चिवटे आणि त्यांच्या चमूने रुग्णसेवेत झोकून दिले आहे.

पहिल्याच जुलै महिन्यात १९४ रुग्णांना ८३ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २७६ रुग्णांना १ कोटी ४० लाख, सप्टेंबर महिन्यात ३३६ रुग्णांना १ कोटी ९३ लाख, ऑक्टोबर महिन्यात २५६ रुग्णांना २ कोटी २१ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाखांची आणि डिसेंबर महिन्यात विक्रमी ८ कोटी ५२ लाख रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.

‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या निकषात बदल करुन काही खर्चिक उपचार असणाऱ्या आजारांचा समावेश नव्याने करण्यात आला आहे. जास्तीत जास्त गरजू रुग्णांना सहाय्यता करता यावी, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार नवीन आजारांचा समावेश करण्यात आला. याचा सकारात्मक परिणाम म्हणून नव्याने समाविष्ट या आजारांच्या अनेक रुग्णांना मदत उपलब्ध झाली आहे. यामुळे निधीच्या वितरणात वाढ झाली आहे. राज्यातील एकही सर्वसामान्य – गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराविना राहणार नाही याची काळजी घ्या, असा आदेशच संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला पहिल्या दिवशी दिला होता. त्यांच्या सुचनेचे तंतोतंत पालन करण्याचा आणि रुग्णांना दिलासा देण्याचा आम्ही सर्व सहकारी प्रामाणिक प्रयत्न करतो,’ असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कसा मिळवावा ?
मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७
ई- मेल:- [email protected]

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
१. अर्ज (विहीत नमुन्यात)
२. निदान व उपचारासाठी लागणाऱ्या वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. (खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
३. तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला. (रु. १.६० लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
४. रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्य) लहान बाळासाठी (बाल रुग्णांसाठी) आईचे आधारकार्ड आवश्यक
५. रुग्णाचे शिधापत्रिका/रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्य)
६. संबंधित आजाराचे अहवाल/रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
७. अपघातग्रस्त रुग्णांसाठी MLC अहवाल/रिपोर्ट आवश्यक आहे.
८. प्रत्यारोपण रुग्णांसाठी ZTCC/शासकीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
९. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.

● अर्थसहाय्याची मागणी ई मेलव्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात (वाचनीय) पाठवावी. ई- मेल:- [email protected] तसेच त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत.

■ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे :
१. कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष २ ते ६)
२. हृदय प्रत्यारोपण
३. यकृत प्रत्यारोपण
४. किडणी प्रत्यारोपण
६. बोन मॅरो प्रत्यारोपण
५. फुफ्फुस प्रत्यारोपण
७. हाताचे प्रत्यारोपण
८. हिप रिप्लेसमेंट
९. कर्करोग शस्त्रक्रिया
१०. अपघात शस्त्रक्रिया
११. लहान बालकांचे शस्त्रक्रिया
१२. मेंदूचे आजार
१३. हृदयरोग
१४. डायलिसिस
१५. अपघात
१६. कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
१७. नवजात शिशुंचे आजार
१८. गुडघ्याचे प्रत्यारोपण
१९. बर्न रुग्ण
२०. विद्युत अपघात रुग्ण
या अशा एकूण २० गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकीय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी टोल फ्री क्र. : ८६५०५६७५६७
संपर्क क्र. ०२२-२२०२६९४८ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष अंगीकृत असलेल्या रुग्णालयांची सविस्तर माहिती आणि रुग्णालयांची यादी https://www.mahacmmrf.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.