महिला दिन विशेष – स्टोरीटेलवर महिला लेखिकांचा सन्मान!

‘महिला दिन विशेष’,’ऐकू आनंदे’ या कार्यक्रमामध्ये डिजिटल युगातील लेखिका म्हणून घडण्याबद्दल ‘स्टोरीटेल ओरिजनल’च्या लेखिका दीपा देशमुख यांनी माधवी वागेश्वरी, सायली केदार यांच्याशी संवाद साधून नवसाहित्य निर्मितीतील पैलू उलगडण्याचा रंजक सवांद साधला. यानिमित्ताने साहित्य लेखनातील या तीन भिन्न लेखिकांची विचारधारा ऐकण्याची संधी स्टोरीटेलने रसिकांना दिली आहे.

‘डिजिटल माध्यम’ हे साहित्यासाठी अनेकार्थाने वरदान ठरत असल्याचे मत प्रख्यात साहित्यिक दीपा देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पुढे त्या म्हणतात, ‘डिजिटल साहित्यामुळे आपण कधीही, केव्हाही, कुठेही ऐकू शकतो, यामुळे ऐकणं खूप सोप झालं आहे’ त्यांच्या या मताला दुजोरा देत लेखिका सायली केदार म्हणाल्या, ‘आपला मोबाईल असंख्य गोष्टींची बँक आहे, त्यात आपण कोणतीही गोष्ट ऐकू, वाचू, पाहू शकतोय. आपल्याला हेडफोन लावून आपल्या आवडीच्या गोष्टी सहज ऐकता येतात. सुरुवातीला मी माझ्या इरॉटिकाची फेसबुकवर पोस्ट केली होती, तेव्हा एकही लाईक्स किंवा कमेंट्स आल्या नाहीत. नंतर मी त्यात एक लाईन ऍड केली, ‘हे पुस्तक तुम्ही स्टोरीटेलवर नक्की ऐका, पण हेडफोन लावल्याशिवाय ऐकू नका’… त्यांनतर मिळालेला प्रतिसाद प्रचंड होता…’ ‘जग बदलणारे ग्रंथ’ सिरीजमधील ‘कामसूत्र’ सारखा ग्रंथ वाचताना आपल्या आजूबाजूला कोणी नसावं असं वाटतं, ही उणीव डिजिटलमुळे भरून निघाली आहे, असं लेखिका दीपा देशमुख यांना वाटतंय.

आपण सध्या वेगाच्या दुनियेत जगत आहोत. आसपासच्या अनेक गोष्टी बदलत आहेत. त्यासोबतच छापील पुस्तकेही एक पायरी ओलांडून ‘डिजिटल ऑडिओ बुक्स’च्या रूपात पुढे गेली आहेत. ती लिहिणाऱ्याने त्यात किती भाव ओतले आहेत, त्याचे क्राफ्टिंग किती मजबूत आणि कसदार लिहिले आहे त्यातूनच तो भाव श्रोत्यांपर्यंत पोहचतो. म्हणून ‘डिजिटल ऑडिओ बुक्स’ लिहिणे हे अधिक चॅलेंजिंग आहे. ती छापील पुस्तकांची पुढची पायरी आहे. वेगाच्या गतीमुळे शिकण्याचा वेगही गतिमान झाला आहे. अनेक महिला – मुलींनी गतिमान होऊन लिहायला,ऐकायला हवं, असं या संवादातून तिन्ही लेखिकांनी व्यक्त केले. जग बदलत असलं, तरी महिलांचे प्रश्न फार बदललेले नाहीत आणि म्हणूनच नवनव्या लेखिका निर्माण व्हायला हव्यात. आज उपलब्ध असलेल्या संधीचा फायदा घेऊन, तुम्ही भरपूर वाचू-ऐकू शकता आणि त्यातून व्यक्त होऊन तुमचे प्रश्न थेट मांडू शकता असे परखड मत या लेखिकांनी यानिमित्त बोलताना व्यक्त केले.

माधवी वागेश्वरी यांनी स्टोरीटेलसाठी ‘सिंगल कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’, ‘करसाळ’ या दहा-दहा भागाच्या दोन ओरिजनल सिरीज लिहिल्या आहेत. शिवाय काही लघुकथाही त्यांनी ‘स्टोरीटेल’साठी लिहिल्या आहेत. त्यांनी लिहिलेली ‘सिंगल कमिटेड, कॉम्प्लिकेटेड’ ही प्रेमकथा आणि ‘करसाळ’ ही गूढकथा त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लिखाणामुळे तसेच अभिनेत्री पूजा ठोंबरे, साईनाथ गणूवाड, ऋता पंडित, गजानन परांजपे, उर्मिला निंबाळकर यांच्या वैशिष्टयपूर्ण सादरीकरणामुळे या सर्व मालिकांचे भाग स्टोरीटेलवर खूप लोकप्रिय आहेत. सायली केदार यांनी ‘स्टोरीटेल’साठी काही इरॉटिका, ‘रोमँटिक, रोमँटिक कॉमेडी, क्राईम थ्रिलर अशा दहा-दहा भागांच्या सिरीज लिहिल्या आहेत. ‘केस नं ००१’, ‘केस नं ००२’ या क्राईम सिरीज आहेत. त्यांनी ‘डेस्परेट हजबंड’ आणि इतर काही इरॉटिक लघुकथांचे ‘स्टोरीटेल ओरिजनल’साठी सिरीज लिहिल्या आहेत. प्रत्येक सिरीजसाठी शीर्षक सुचण्याची प्रोसेस फार गंमतीशीर असते. ‘डेस्परेट हजबंड’मध्ये पाच महिलांच्या भन्नाट कथा ऐकायला मिळतात. यात पहिल्यांदाच चाकोरी मोडून केलेलं लिखाण आहे. या सिरीजला ‘स्टोरीटेल’वर अफलातून प्रतिसाद मिळत आहे.

प्रतिथयश लेखिका म्हणून आज दीपा देशमुख सर्वज्ञात आहे. त्यांची सुमारे ३२ पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या ‘जग बदलणारे ग्रंथ’ या पुस्तकाला राज्यशासनाचा सन २०२१ चा स्व. ‘यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. सन २०२२ चा मानवाधिकार पुरस्कार सुध्दा त्यांना मिळाला आहे. ‘जग बदलणाऱ्या ग्रंथां’ची ओळख करून देणारी सिरीज खास ‘स्टोरीटेल मराठी’च्या श्रोत्यांना ‘स्टोरीटेल’वर ऐकण्यास उपलब्ध आहे.