मुलामुलींना समान संधी देण्यास प्राधान्य देण्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे आश्वासन

पुणे:प्रत्येक देशात खेळामध्ये मुला मुलींना समान संधी दिली जाते. याची अंमलबजावणी आपल्याकडेही व्हायला हवी आणि यासाठी महाराष्ट्र शासन पुढाकार घेईल, असे प्रतिपादन राज्याचे क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी केले. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ऑलिम्पिक दिनाच्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते. यावेळी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या विविध निर्णयांची माहिती दिली. खेलो इंडिया आणि राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करुन महाराष्ट्राचे नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा आम्हाला अभिमान वाटतो. यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी क्षणाचाही विलंब नं लावता खेळाडूंच्या पुरस्कारांच्या रकमेत वाढ केली. क्रीडा सुविधा उपलब्ध होण्यासाठी तालुका क्रीडा संकुलांना ५ कोटी आणि जिल्हा संकुलांना १० कोटी रुपये अनुदान देत असल्याचेही संजय बनसोडे यांनी सांगितले. आता महाराष्ट्राच्या खेळाडूंचे सातत्य असेच कायम राहिल्यास ही रक्कम तिप्पट केली जाईल असं आश्वासनही बनसोडे यांनी भाषणात दिले. न्यायालयीन वादात अडकल्यामुळे विलंब झालेल्या शिवछत्रपती पुरस्कारांचे वितरण देखील लवकरच एका भव्य दिव्य सोहळ्याच्या माध्यमातून करू असं आश्वासनही मंत्री संजय बनसोडे यांनी ऑलिम्पिक असोसिएशनच्या मागणीनंतर दिले.

भारताने ऑलिम्पिक खेळाच्या आयोजनाची तयारी दाखवली आहे. ऑलिम्पिक महाराष्ट्रात व्हावं यासाठी आम्ही जरुर प्रयत्न करु. खेळाडूंना समोर ठेवून काम करणारा मी मंत्री आहे. त्यामुळे खेळाडूंच्या अडीअडचणी समजून त्या पूर्ण करण्यास माझे प्राधान्य असते. शिवछत्रपती पुरस्कार वितरण सोहळा काही कारणांनी रखडला आहे. पण, लवकरच या सोहळ्याचा दिवस निश्चित करून भव्य स्वरुपात हा कार्यक्रम घेण्याचेही आश्वासन संजय बनसोडे यांनी दिले. ऑलिम्पिक दिनाच्या शुभेच्छा देताना संजय बनसोडे यांनी इनडोअर क्रीडा सुविधांसाठी ७ लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर केली.

ऑलिम्पिक ही क्रीडा स्पर्धा नाही, ही एक चळवळ आहे. यासाठी खेळाडू अपार मेहनत घेत असतो. ऑलिम्पिक खेळण्याची प्रत्येक खेळाडूची इच्छा असते आणि खेळायला मिळाल्यावर तो खेळाडूचा अभिमान असतो. त्यामुळेच खेळासाठी तन,मन, धन असे सर्वस्व अर्पण करावे लागले, अशा शब्दात ऑलिंपिक पटू नेमबाज अंजली भागवत यांनी ऑलिम्पिकचे महत्व विशद केले. ऑलिम्पिक दिनाचे औचित्य साधून याची देशात प्रगती व्हावी असे वाटत असेल, तर सगळी व्यवस्था एका चांगल्या व्यक्तीकडे दिली जावी अशी अपेक्षा आपण सर्वजण आजच्या ऑलिम्पिक दिनी व्यक्त केली तर ती चूक ठरणार नाही, असेही अंजली भागवत म्हणाल्या.ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताने उत्सुकता दाखवली हे खूप चांगले आहे. दुसऱ्या देशात ऑलिम्पिकच्या तयारीला सुरुवात देखील झाली आहे आपण मात्र अजून आराखडा बनवण्यातच अडकून पडलो आहोत, त्यामुळे या तयारीला गती देण्याची गरज अंजली यांनी व्यक्त केली.

भारताचे माजी हॉकी कर्णधार धनराज पिल्ले यांनी आपल्या भाषणात क्रीडा मंत्र्यांच्या घोषणांचा उल्लेख करत खेळाडूंवर अन्याय होणार नाही, याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. देशासाठी क्रीडा क्षेत्रात मोठी कामगिरी करणारे धनराज पिल्ले, अंजली भागवत, देविंदर वाल्मिकी, विक्रम पिल्ले यांच्यासह अनेक ऑलिम्पियन तसेच आंतरराष्ट्रीय क्रीडापटू या ऑलिंपिक दिनानिमित्त आयोजित समारोहाला उपस्थित होते.

सकाळी लालमहाल येथून श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून क्रीडा रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीतही अनेक खेळाडू, क्रीडा संघटक उपस्थित होते. स. प. महाविद्यालयात रॅलीची सांगता झाल्यावर झालेल्या सोहळ्यात क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते उपस्थित ऑलिम्पियन खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर जिम्नास्टिक, वूशू, मार्शल आर्ट, मुष्टीयुद्ध, तायक्वांदो, योगासन, मल्लखांब अशा अनेक खेळांची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.