‘स्वामी दरबार’ १० एप्रिलपासून भक्तांच्या भेटीला…

मुंबई:अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा ‘ दरबार ‘ पुढील आठवड्यापासून भक्तांच्या भेटीला येत आहे. गीत, संगीत, नृत्य, नाट्य आणि नामस्मरण असे या आगळ्या अध्यात्मिक रंगप्रयोगाचे स्वरूप असून बुधवार, १० एप्रिलला म्हणजेच स्वामी प्रकट दिनी शिवाजी मंदिर येथे रात्री ८:०० वाजता या दरबाराचा शुभारंभाचा प्रयोग होणार आहे.

ऑल सेट या संस्थेची निर्मिती असलेला हा दरबार स्वामीराज प्रकाशन यांनी आयोजित केला आहे. या दरबाराचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रयोगाला काही नामवंत सेलिब्रिटी प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांचे स्वामी कृपानुभव सांगणार आहेत. शुभारंभ प्रयोगाला अनेक चित्रपट, मालिकांमध्ये’स्वामींची’भूमिका साकारणारे अशोक कुलकर्णी आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री दिप्ती भागवत या दरबारात निरूपण सुसंवादकाची भूमिका साकारणार आहेत.

सागर देशपांडे संकल्पित – दिग्दर्शित या कार्यक्रमासाठी खास गीत लेखन श्रावण बाळा यांनी केले असून शशिकांत मुंबरे यांनी स्वरसाज दिला आहे. पद्मश्री सुरेश वाडकर आणि साधना सरगम हे गायक असून नाट्य दिग्दर्शन, नेपथ्य सुनील देवळेकर यांचे आहे. नृत्य दिग्दर्शन सचिन गजमल यांचे असून नृत्य – नाट्य कलाकारांसह तरुण रंगकर्मी मयुरेश कोटकर हे स्वामींची भूमिका साकारणार आहे रजनी आणि पूजा राणे निर्मात्या आहेत. हा दरबार सर्व स्वामी भक्तांसाठी अध्यात्मिक पर्वणी असून सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.