मुंबई : हिंदु महासभेचे माजी अध्यक्ष, प्रज्वलंत मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांचं मंगळवारी २१ मार्च २०२३ या दिवशी पुणे इथं निधन झालं. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुणे इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत अन्त्यसंस्कार करण्यात आले. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे कनिष्ठ बंधू डॉ. नारायण दामोदर सावरकर यांच्या त्या स्नुषा होत. त्यांचे ज्येष्ठ पुत्र पृथ्वीराज सावरकर यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं, तर त्यांचे कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर हे सावरकर स्मारकाचे कार्याध्यक्ष असून मुरबाड इथं राहतात.
आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दिवसात स्वामिनी सावरकर या त्यांचे ज्येष्ठ पुत्र दिवंगत पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. प्रज्वलंतचे संपादक पती विक्रम सावरकर यांच्यासोबत त्यांनी वृत्तपत्राचे कामही सांभाळलं. यासोबतच मुरबाड इथल्या महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचं कामही त्यांनी पाहिलं, तिथे त्या कनिष्ठ पुत्र रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ या दिवशी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग गोखले असं होतं. तर आईचं नाव मनोरमा गोखले असं होतं. विवाहापूर्वीचं त्यांचं नाव मंदाकिनी गोखले होतं. त्यांना दोन बहिणी आणि एक बंधू होते. त्यांचा विवाह ११ मे १९५८ या दिवशी विक्रम सावरकर यांच्याशी झाल्यानंतर सावरकर कुटुंबात स्वामिनी म्हणून त्यांचं आगमन झालं. तेव्हापासून सामाजिक कार्य, संपादन कार्य यासह विविध क्षेत्रात त्या स्वामिनी विक्रम सावरकर म्हणून ओळखल्या जात.