स्वप्नील आणि प्रसादची ‘जिलबी’

मुंबई : अभिनेता स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांनी आपल्या मिश्किल स्वभावाने मनोरंजनाचा गोडवा कायमच वाढवला आहे. सध्या मात्र हे दोघंही ‘जिलबी’ चा मनमुराद आस्वाद घेत तिचा गोडवा चाखतायेत. शूटिंग दरम्यान ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत या दोघांनी जिलबीवर येथेच्छ ताव मारला. आणि हो … ही ‘जिलबी’ ते प्रेक्षकांनाही देणार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर यांची निर्मिती असलेला ‘जिलबी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे सध्या या चित्रपटाचे जोरदार चित्रीकरण सुरु आहे. या चित्रीकरणाच्या वेळी धमाल जिलबीचा आस्वाद घेण्याचा मस्त बेत या दोघांनी नुकताच केला. केवळ प्लॅन करून हे दोघे थांबले नाहीत तर चित्रपटाच्या प्रसिद्धीसासाठी एक मजेशीर व्हिडिओ ही या दोघांनी बनवला. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे ही या दोघांची फिरकी घेतायेत.

स्वप्नील आणि प्रसाद हे दोघंही ‘जिलबी’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसणार आहेत. दोन गोड माणसं एकत्र आल्यावर चित्रपटाचा ‘गोडवा’ नक्कीच वाढणार असं दिग्दर्शक नितीन कांबळे सांगतात. रसिक प्रेक्षकांचा आनंद द्विगुणीत करायला चांगला विषय प्रेक्षकांसाठी घेऊन येत असल्याचे निर्माते आनंद पंडित यांनी सांगितले. या दोघांसोबत ‘जिलबी’ चित्रपटात शिवानी सुर्वे, पर्ण पेठे, गणेश यादव, प्रणव रावराणे,अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका आहेत.

कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. छायांकन गणेश उतेकर यांचे आहे. कलादिग्दर्शन कौशलसिंग यांचे असून क्रिएटिव्ह दिग्दर्शन राहुल व्ही.दुबे यांचे आहे. रूपा पंडित आणि राहुल व्ही.दुबे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.