टेबल टेनिस मिश्र दुहेरीत सानिलच्या साथीने सुवर्ण, तर एकेरीत रौप्यपदक

पणजी : दिया चितळेच्या दुहेरी यशामुळे महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील टेबल टेनिस क्रीडा प्रकारात आपली यशोपताका फडकवत ठेवली. दियाने मिश्र दुहेरीत सानिल शेट्टीच्या साथीने सुवर्णपदक, तर एकेरीत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राने गुरुवारी टेबल टेनिसमध्ये एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य अशी तीन पदके कमावली.गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कोर्टवर झालेल्या या स्पर्धेतील मिश्र दुहेरी गटात महाराष्ट्राच्या सानिल आणि दिया चितळे जोडीने पश्चिम बंगालच्या अंकुर भट्टाचार्य आणि कौशानी नाथ जोडीचे आव्हान अंतिम फेरीत ३-० (११-६, ११-४, ११-२) असे सहज मोडीत काढले.

महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दियाने अर्चना कॉमतला कडवी झुंज दिली. परंतु दियाने १-४ (४-११, ७-११, ६-११, ११-७, १०-१२) अशी हार पत्करली. त्याआधी उपांत्य सामन्यात दियाने महाराष्ट्राच्याच स्वस्तिका घोषचा ४-० असा पराभव केला. त्यामुळे स्वस्तिकाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये महाराष्ट्राने तीन सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य अशी एकूण आठ पदके पटकावली आहेत. मागील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने एक रौप्य आणि चार कांस्य अशी पाच पदके मिळवली होती.

“राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या टेबल टेनिसपटूंनी अपेक्षेप्रमाणे खूपच चांगली कामगिरी करताना आठ पदके मिळवली आहेत. पण तीन पदके थोडक्यात निसटल्याची खंत वाटते. अन्यथा, ही आणखी तीन पदके महाराष्ट्राच्या खात्यात जमा झाली असती, तर महाराष्ट्राचे वर्चस्व सिद्ध झाले असते.”

– महेंद्र चिपळूणकर, महाराष्ट्राच्या टेबल टेनिस संघाचे प्रशिक्षक