मुंबई : स्वतःच्या समस्यांबद्दल बोलण्यासाठी तमाशा कलाकार ‘ओक्के हाय एकदम’ हे नवीन नाटक घेऊन आता रंगभूमीवर आले आहेत. ‘काली बिल्ली प्रॉडक्शन्स’ आणि ‘भूमिका थिएटर्स’ यांची निर्मिती असलेल्या या नाटकाची संकल्पना आणि संशोधन सावित्री मेधातुल यांचे आहे. नाटकाचे लेखन गणेश पंडित आणि सुधाकर पोटे यांनी केले असून, गणेश पंडित यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.
इतर सामाजिक किंवा राजकीय समस्यांच्या बाबतीत तमाशा कलाकार आतापर्यंत वगनाट्यांमध्ये त्यांच्या पद्धतीने विनोदी शैलीत भाष्य करत आले आहेत. पण प्रथमच हे कलाकार त्यांचे स्वतःचे म्हणणे ‘ओक्के हाय एकदम’ या नाटकातून खुसखुशीत शैलीत मांडत आहेत. लावणी आणि लोककलेच्या अभ्यासक सावित्री मेधातुल यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. आकांक्षा कदम यांनी या नाटकासाठी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे. विलास हुमणे आणि इमॅन्युअल बत्तीसे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. सावित्री मेधातुल, वैभव सातपुते, सुधाकर पोटे, सीमा पोटे, पंचू गायकवाड, विनोद अवसरीकर, विक्रम सोनवणे, अभिजीत जाधव, प्रज्ञा पोटे, भालचंद्र पोटे, चंद्रकांत बारशिंगे हे कलावंत या नाटकात भूमिका साकारत आहेत.