स्वातंत्र्य दिन विद्यानिधी शैक्षणिक संकुलात संपन्न

मुंबई: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ऑगस्ट २०२३ ला पश्चिम उपनगरातील विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील शाळेच्या प्रांगणात सकाळी भारतमाता पूजन आणि त्यानंतर प्रसिद्ध सनदी लेखापाल विपुल गांधी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता आणि श्री शिवछत्रपती महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याची साडेतीनशे वर्ष यांचे औचित्य साधून विद्यानिधी संकुलातील चौदा विद्या शाखांमधील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गाणी, नाट्यप्रवेश आणि भाषण यातून देशाप्रति आपली भावना व्यक्त केली.

प्रसिद्ध सनदी लेखापाल विपुल गांधी यांनी आपल्या वैचारिक भाषणात भारत विश्व गुरु आणि आर्थिक महासत्ता होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमन करत आहे.आज तंत्रज्ञान क्षेत्रात अमूलाग्र बदल होत आहेत. अशा परिस्थितीत शाळा -महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोबाईल गेम आणि इंटरनेटच्या गुलामीतून बाहेर पडणे गरजेचे आहे. पुढचा काळ हा अतिशय वेगवान आणि जागतिक स्पर्धेचा असणार आहे. यासाठी ज्ञान समृद्धीचा अवलंब प्रत्येकाने केला पाहिजे. विद्यानिधीतील संस्कार मूल्ये पाहून मी भारावून गेलो .असे विचार त्यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सांगते नंतर संस्थेच्या प्रथेप्रमाणे विद्यानिधी विज्ञान महाविद्यालय आणि कुपर रुग्णालय यांच्या सहकार्याने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आहे होते.यात पालक, माजी विद्यार्थी आणि जुहू परिसरातील स्थानिक नागरिकांनी रक्तदान केले.

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमास उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री,कोषाध्यक्ष विनायक दामले, आजीवन सदस्य डॉ. कीर्तिदा मेहता,शिक्षक-शिक्षकेतरवृंद ,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सानिका घाणेकर आणि आदिती शर्मा यांनी केले.