अंधेरीतील विद्या विकास मंडळ विद्यालयातल्या विद्यार्थिनींचा रक्षाबंधनाद्वारे ‘एक धागा प्रेमाचा, विश्वासाचा आणि मायेचा…’ !

मुंबई : ‘एक धागा प्रेमाचा, विश्वासाचा आणि मायेचा…’ भावाच्या मनगटावर बहिणीने राखी बांधल्यावर भाऊ तिला तिच्या रक्षणाचे वचन देतो. हाच धागा पकडून आपल्याला शिक्षणातील विविध संधी देणाऱ्या समाज बांधवांना, शाळेचे हितचिंतक आणि माजी विद्यार्थ्यांना विद्या विकास मंडळ विद्यालयाच्या विद्यार्थिनी मागील अनेक वर्षांपासून स्वतः केलेल्या राख्या बांधतात. अंधेरीतील विद्या विकास मंडळ विद्यालयातील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनातून सामाजिक बांधिलकी जपत ‘एक धागा प्रेमाचा, विश्वासाचा आणि मायेचा’ हे ब्रीद अधोरेखित करत शाळेच्या परिसरात राहणाऱ्या पोलीस दलातल्या अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवरांना विद्यार्थिनी प्रत्यक्ष जाऊन या राख्या बांधतात. दूर राहणाऱ्या मान्यवर, समाज बांधव आणि माजी विद्यार्थ्यांना राख्या टपालाने पाठवल्या जातात. मुली स्वतः या पर्यावरण स्नेही राख्या तयार करतात. या उपक्रमातून नात्यांना दृढ करण्याबरोबरच विद्यार्थ्यांवर सामाजिक कृतज्ञतेचा संस्कार देखील केला जातो.

विद्या विकास मंडळ विद्यालयाने मागील साडेसहा दशकांपासून अनेक विद्यार्थी घडवले आणि मुलांचे शैक्षणिक आणि सांस्कृतिक विश्व समृद्ध केले. त्याच बरोबरीने संस्कृती टिकवण्यात देखील हातभार लावला आहे.