बाप आणि लेकीचं हळवं नातं टिपणारा ‘द्विधा’ चित्रपटाचा टिझर झाला लाँच!

मुंबई:मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घालणारे सतीश पुळेकर यांच्या ‘द्विधा’ या आगामी मराठी चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टिझर प्रदर्शित झाला आहे. दिर्घकाळानंतर सतीश पुळेकर ‘द्विधा’ चित्रपटातून प्रमुख भूमिकेत येत असल्याचे दिसत आहेत. बाप आणि लेक यांच्यातील नाजूक आणि गुंतागुंतीच्या नात्याचा जणू वेध घेणारा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या मनावर खोल परिणाम करत आहे. या चित्रपटात वडील आणि मुली मधील भावनिक बंधांच एक मार्मिक आणि हृदयस्पर्शी नातं असल्याचं दिसत आहे.

बॉलीवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे ट्रेलर आणि प्रोमोज संकलित करून भावनिक दृष्ट्या अनुनाद कथाकथनाचा अनुभव असणारे निलेश नाईक यांनी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच विदुला नाईक यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर यांच्यासोबत आकर्षक आणि अष्टपैलू अभिनयासाठी ओळखली जाणारी प्रचंड प्रतिभावान अभिनेत्री मानसी कुलकर्णी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेटफ्लिक्स आणि इतर अनेक चित्रपट, वेब सिरीजसाठी आपलं संगीत देणारे निलोत्पल बोरा यांनी चित्रपटास संगीतबद्ध केले असून मंगेश कांगणे यांनी शब्दबद्ध केले आहे.

निलेश नाईक यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले, “फादर्स डेचं निमित्त साधून द्विधा चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना सादर करताना मनात एक आनंदी धाकधूक आणि उत्साह वाटत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन करणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. सतीश पुळेकर यांसारख्या दिग्गजांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रेक्षकांना चित्रपटाचा भावनिक प्रवास आवडेल अशी आशा करीत आहे.”

हृदयस्पर्शी संगीत आणि कॅनव्हासवर रंगवलेल्या चित्रांसारखी दिसणारी दृश्ये प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्कंठा निर्माण करत आहे. वडील आणि मुलींमधील चिरस्थायी प्रेम आणि हळवे संबंध चित्रपटातून लवकरच पहायला मिळणार आहेत.