मुंबई: रोड ट्रीप म्हटली की, धमाल, मजा आणि मस्ती… वेळोवेळी सर्वांनीच अशा प्रकारची रोड ट्रीप अनुभवली असेल, पण आता हा आनंद मोठ्या पडद्यावर लुटण्याची संधी रसिकांना मिळणार आहे. ‘श्री गणेशा’ हा मराठीतील आगळावेगळा रोड मूव्ही प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘श्री गणेशा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. हास्य-विनोद आणि गंमती-जंमतीची मेजवानी असलेल्या या मराठी फॅमिली एन्टरटेनर रोड मुव्हीची ट्रेलरमधील झलक उत्सुकता वाढवणारी आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘श्री गणेशा’ धमाल रोड ट्रीपचा आणि ‘श्री गणेशा’ फॅमिली एंटरटेनमेंटचा’ असे म्हणत खऱ्या अर्थाने रोड ट्रीपच्या रोलर कोस्टर राईडवर नेणाऱ्या ‘श्री गणेशा’ या फॅमिली एंटरटेनमेंटची प्रस्तुती एमएच-१२ सिने मीडियाने आऊट ऑफ द बॅाक्स फिल्म्सच्या सहयोगाने केली आहे. संजय माणिक भोसले आणि कांचन संजय भोसले या चित्रपटाचे निर्माते असून, या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक मिलिंद कवडे पुन्हा एकदा लाफ्टर आणि मॅडनेसचा डबल धमाका करणार आहेत. रवि माणिक भोसले आणि महेश माणिक भोसले या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ट्रेलरची सुरुवातच संजय नार्वेकरने साकारलेल्या भाई वेंगुर्लेकर या व्यक्तिरेखेपासून होते. संजयसोबत शशांक शेंडे आणि प्रथमेश परब हे मुख्य भूमिकेतील कलाकारही आहेत. त्यानंतर ‘रस्ता कसाही असला…’ गाण्याद्वारे नयनरम्य लोकेशन्सची सफर घडते. फूड ब्लॅागर असलेल्या नायिकेची म्हणजेच मेघा शिंदेची एन्ट्री होते आणि ट्रेलरचा प्रवास पुढे सुरू होतो. ‘आली मधुबाला…’ गाण्याचा तडकाही ट्रेलरला आहेच. हा चित्रपट केवळ धमाल-मस्ती नसून, याला पिता-पुत्राच्या नात्याची किनारही जोडण्यात आल्याने ‘उन-सावलीचा चाले खेळ…’ हे गाणे येताच जाणवते. ‘कारण बाप असतो आवाक्याबाहेर, कधीच कोणाला कळत नाही’, हा डायलॅाग मनाला भिडतो. ट्रेलरच्या शेवटी पुन्हा संजय नार्वेकरचे कॅरेक्टर आपल्या अनोख्या शैलीत भेटतो. प्रदर्शित करण्यात आलेला ट्रेलर खऱ्या अर्थाने प्रेक्षकांना ‘श्री गणेशा’ चित्रपटामध्ये काय पाहायला मिळणार याची झलक दाखवणारा असून, चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवणारा असल्याचे मत दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी व्यक्त केले आहे.
‘श्री गणेशा’ चित्रपटाची कथा मिलिंद कवडे यांनी लिहिली आहे. मिलिंद यांनीच संजय नवगिरे यांच्या साथीने पटकथालेखनही केले आहे. संवाद लेखनाची जबाबदारी संजय नवगिरे यांनी सांभाळली आहे. डीओपी हजरत शेख वली यांनी सिनेमॅटोग्राफी, तर संकलन गुरु पाटील यांनी केले आहे. गीतकार जय अत्रे आणि मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार वरुण लिखते यांनी संगीत दिले असून, पार्श्वसंगीत अभिनय जगताप यांचे आहे. कला दिग्दर्शन सुमित पाटील यांचे असून, नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे यांचे आहे. दिपक एस. कुदळे (पाटील) या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता असून विनोद शिंदे यांनी सहदिग्दर्शन केले आहे.