विद्यानिधी संकुलामध्ये स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना आदरांजली…

मुंबई : जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील माधुरीबेन वसा हाँलमध्ये उपनगर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आणि नागालँड राज्याचे माजी राज्यपाल स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांना विद्यानिधी परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. पद्मनाभ आचार्य यांना १०नोव्हेंबर २०२३ ला वयाच्या ९२ व्या वर्षी देवाज्ञा झाली.

उपनगर शिक्षण मंडळ हा समाज जीवनातील त्यांचा विशाल परिवार. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून अगदी विद्यार्थी जीवनातून समाजकार्य आणि समाजसेवेशी त्यांचे नाते जोडले गेले, ते अव्याहतपणे आजीवन एखाद्या व्रताप्रमाणे निरंतर चालूच होते. उपनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक स्वर्गीय श्रीराम मंत्री यांच्या खांद्याला खांदा लावून वंचितांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे कार्य त्यांनी पाच दशकाहून अधिक काळ केले.

अशांत पूर्वांचल भाग शांत करण्यासाठी पद्मनाभ आचार्य यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनापासून आयुष्याच्या अखेर पर्यंत आयुष्य खर्च केले. अशा शब्दात उपनगर शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रमेश भाई मेहता यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना आचार्य यांचे पूर्ण जीवनच राष्ट्रासाठी समर्पित होते, अशी भावना व्यक्त केली .पद्मनाभ आचार्य यांचे विशी पासूनचे स्नेही राजाभाऊ मोगल यांनी आपल्या दिवंगत मित्राच्या निस्सीम कार्याचा गौरव केला. उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री यांनी पद्मनाभआचार्य यांच्याबरोबर शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो .पद्मनाभ यांच्या शब्दकोशात अशक्य हा शब्दच नव्हता . त्यांच्या मार्गदर्शनाखाली मला खूप काही शिकता आले, अशी भावना व्यक्त केली. विद्यानिधी शैक्षणिक संकुलातील प्राचार्य मनोज परमार आणि निधी पोदार यांनी आचार्यजींच्या मार्गदर्शना खाली इशान्यपूर्व भारतात बंधुत्व वाढविण्या साठी उपनगर शिक्षणमंडळाच्या संस्थांनी पूर्ण केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.

राजश्री पाटील, नीलम प्रभू, संतोष टक्के, सतीश दुबे, मीरा पवार यांनी शब्दसुमनांनी आचार्य सरांचे मार्गदर्शन आणि नियोजनातील बारकावे याबद्दलच्या असंख्य आठवणी आवर्जून सांगितल्या .संगीत शिक्षक घोसाळकर ,कुमारी केंजाळकर, लिपिक दीपक कोठेकर यांनी स्वरांजली अर्पण केली. शिक्षक मोहन वाघ , विद्यानिधी शैक्षणिक संकुलाचे माजी विद्यार्थी जयवंत राऊत यांनी पद्मनाभ आचार्य यांच्या राज्यपाल कालखंडातील विशेष आठवणींना उजाळा दिला. श्रद्धांजली कार्यक्रमासाठी अरुणाचल प्रदेश येथून आलेल्या सोसायथी यांनी आचार्य सर यांच्या मार्गदर्शनामुळेच आपण राष्ट्रकार्य म्हणून अरुणाचल प्रदेशात शाळा सुरू केली आहे. समाज प्रबोधनांमध्ये वंचितांच्या विकासावर लक्ष देण्याची गरज आहे. या आचार्य सरांच्या मूलमंत्रास मी कधीच विसरणार नाही अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

उपनगर शिक्षण मंडळाच्या सचिव डॉ.साधना मोढ ,आजीव सदस्य नीरव देसाई, चंद्रहास देशपांडे ,डॉ.कीर्तीदा मेहता आचार्य सरांच्या मित्रपरिवारतील गणमान्य व्यक्ती, उपनगर शिक्षण मंडळाचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी ,सेवक वर्ग यांनी स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली दिली. स्वर्गीय पद्मनाभ आचार्य यांचे सुपुत्र चंद्रगुप्त आचार्य यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी सांगताना त्यांची कामातील गती ,दिशा आणि ध्येयपूर्तीचा उद्देश किती व्यापक असायचा हे आवर्जून सांगितले. स्व. पद्मनाभ आचार्य यांचे समाजकार्य आणि राष्ट्रकार्य दाखवणाऱ्या जीवनपटाची क्षणचित्रे लघुपटाच्या माध्यमातून यावेळी दाखवण्यात आली.