मुंबई:अंधेरीतील जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्र. पा. हायस्कूल मराठी माध्यमिक विभाग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यक्तिमत्व विकास व्हावा त्यांना नवीनतम शिकण्याची ओढ निर्माण व्हावी यासाठी सतत कृतीशील असते.याचे उत्तम उदाहरण म्हणजे विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागाने रोटरी क्लब आणि विद्यानिधी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी MKCL क्लिक स्क्रॅच संगणकीय प्रोग्रामिंग तीन महिन्यांचा अभ्यासक्रम उपनगर शिक्षण मंडळाच्या SMVITA या संस्थेच्या मदतीने आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण अभ्यासक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ रॉयल्स यांच्या अध्यक्षा रोटेरियन टिना रुंगटा आणि सदस्य रोटेरियन संगीत मोदी यांचा भक्कम पाठिंबा या प्रकल्पाला होता.
या कार्यशाळेचे समापन दिनांक ५ एप्रिल २०२४ ला विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळा विद्यार्थ्यांच्या विकासासाठी किती मेहनत घेते ते दाखवून दिले. स्क्रॅच व पायथॉन शिकलेल्या विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेले ज्ञान वेगवेगळ्या सादरीकरणाद्वारे प्रक्षेपित केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरीन संगीत मोदी व उपनगर शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष संजीव मंत्री सर आणि पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता ही विद्यार्थ्यांना कोर्सचे प्रमाणपत्र देऊन झाली.
अंधेरी विभागातील मराठी माध्यमाची ही एकमेव शाळा आहे जी विद्यार्थ्यांना स्क्रॅच कोडींग व पायथॉनसारखे खर्चिक प्रशिक्षण मुलांना मोफत उपलब्ध करून देते. ही शाळा विद्यार्थ्यांना सतत क्रियाशील ठेवते. म्हणून मराठी माध्यमाचा ऱ्हास होत असतानाही विद्यानिधी मराठी माध्यम आजही भरारी घेत दिमाखात उभी आहे.