नवी मुंबई : या महाराष्ट्राला संकुचित स्वार्थापोटी जातीपातीत विभागण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करताहेत हे पाप, असत्य, अधर्म असून त्यांचे मनसुबे पूर्णत्वाला जाणार नाहीत. खरेतर शिवाजी महाराजांनी आपल्याला भारतासाठी लढायला, जिंकायला शिकवलं हे महाराष्ट्राचं मराठीपण आहे. गल्लीतली संकुचित मानसिकतेची छोटी भांडणं आणि एकमेकांचे गळे कापणं यात मराठीपण नाही. हे विश्वची माझे घर ही संतांची शिकवण व शिवाजी महाराजांनी सांगितलेले हिंदवी स्वराज्य यात आपल्या महाराष्ट्राचा जेनेटिक आहे असे प्रतिपादन सुप्रसिध्द वक्त आणि माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी वाशी येथील विष्णूदास भावे नाट्यगृहात शिवतुतारी प्रतिष्ठान नवी मुंबई व पुरस्कृत ‘शिवबा राजं छत्रपती झालं रं’ या ‘शिवराज्यभिषेक सोहळ्या’प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना केलं.
यावेळी विचारमंचावर सी.ए. प्रा. इ.ए.पाटील, कवी साहेबराव ठाणगे, महिला सक्षमीकरण अभ्यासक शितल निकम, कल्पना संजीव नाईक, ‘शिवतुतारी प्रतिष्ठान’चे प्रा. रविंद्र पाटील उपस्थित होते.
इतिहासाच्या काही पुस्तकांत आक्रमक मोगलांवर, अकबरावर पानंच्या पानं वर्णन आणि शिवाजी महाराजांवर दोन ओळी या सगळ्यांतून मोगलांचं उदात्तीकरण केलं गेलं. काहीजणांच्या मनातून बुध्दीची गुलामी अद्याप गेली नाही. काही जण अजूनही म्हणतात की भारत नावाचा काही देशच नव्हता. ब्रिटीशांनी म्हणे हा देश एकत्र केला असं सांगितलं जातं. पण खरंतर उत्तर टोकाला हिमालय व दक्षिणेसह तिन्ही दिशांना महासागर व त्यांच्या मधला देश म्हणजे भारत ही जाणीव हजारो वर्षे जुनी आहे असे यावेळी श्री. धर्माधिकारी यांनी ठणकावून सांगितले. भारतीय संस्कृती शेवटचे आचके देत होती, या देशाचं भारतपण धोक्यात आलं तेंव्हा मूठभर मावळे घेऊन शिवाजी महाराज उभे राहिले अशा शब्दांत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांप्रति आदर व्यवत केला. याप्रसंगी ‘शिवतुतारी प्रतिष्ठान’चे प्रमुख प्रा. रविंद्र पाटील यांनी ओघवत्या व संवेदनशील प्रकटीकरणातून या शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाहीर रुपचंद चव्हाण यांचा ‘शहिरी बाणा’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी सौ. कल्पना नाईक यांनी आपल्या भाषणातून ‘शिवतुतारी’ व सहभागी संस्थांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक केलं व मुलांच्या मनावर लहानपणापासून शिवाजी महाराजांचे विचार पालकांनी बिंबवण्याची गरज असल्याचं सांगितलं.
सर्वश्री इ.ए.पाटील, साहेबराव ठाणगे, शितल निकम तसेच डॉ.प्रा. अजित मगदूम यांना ‘विशेष राज्यस्तरीय पुरस्कार’ देऊन अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते शिवमुद्रा, सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आलं. सत्कारमूर्तींनी आपल्या सत्काराला योग्य शब्दात भाषणातून उत्तर दिलं. दहावी व बारावी परिक्षांमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्थ्यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिवतुतारी सह पन्नासहून अधिक संस्थांचे कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालनाची बाजू नारायण लांडगे यांनी सांभाळली.