मुंबई: विद्यानिधी व्ही. पी. हायस्कूल मराठी माध्यमातील इयत्ता १० वीच्या आगामी दहावीच्या विद्यार्थ्यांना ‘आता नाही तर कधीच नाही’ या प्रेरणादायी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेच्या माजी विद्यार्थिनी प्रियांका गणेश निगुडकर होत्या. त्या सध्या उर्जा बिल्डिंग सर्विसेस कन्सल्टंट प्रा. लि. कंपनीमध्ये प्रकल्प अधिकारी (Project Manager) विभाग प्रमुख म्हणून कार्यरत उपस्थित होत्या.
प्रियांका यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी करिअरसाठी चार महत्त्वाचे नियम दिले…शिकणे कधीही थांबवू नका, कठोर परिश्रम करा, मोठी स्वप्ने पाहा आणि योग्य निवड करा. स्वतःच्या संघर्षाची आणि यशाची कहाणी सांगत त्यांनी अभ्यास, सातत्य व योग्य निर्णयक्षमतेचे महत्त्व पटवून दिले. दहावीच्या विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून ‘आता’पासूनच मेहनत सुरू केली तर ‘कधीच नाही’ म्हणण्याची वेळ येणार नाही, हा संदेश त्यांनी दिला. या सत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून परीक्षेला सामोरे जाण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली.