पुणे: गावागावात ,वस्त्या पाड्यांवर इथे रंगभूमी कला प्रत्यक्षात पोहोचू शकत नाही, अशा ठिकाणी केवळ वंचितांसाठी मोफत कार्यशाळा घेणाऱ्या प्राध्यापक देवदत्त पाठक यांच्या २१अभिनय कार्यशाळा नुकत्याच पार पडल्या. अभिनय कौशल्य, त्यासाठी असलेले अभिनयाचे प्रकार, आणि त्याच्या जोडीने व्यक्तिमत्व विकसन आणि क्षमता विकसन यांचा आधार घेऊन या कार्यशाळा देवदत्त पाठक आणि मिलिंद केळकर यांनी महाराष्ट्रातील २१ वाड्या, वस्ती ,उपनगर ,गाव, खेडे या ठिकाणी गुरुस्कूल गुफांनच्या नियोजनातून पार पाडल्या. त्यातली शेवटची कार्यशाळा शिरवळच्या सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यम शाळा येथे प्राचार्य प्रताप निकम आणि सौ. निकम, महादेवी कांबळे यांच्या संयोजनातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली.
या कार्यशाळेत २१ कार्यशाळांमध्ये रंगमंचीय खेळ, रंगभूमी पाठ चर्चा चिकित्सा आणि प्रात्यक्षिक सादरीकरण याचा अनुभव मुलांनी घेतला. या कार्यशाळेत शाळेच्या शिक्षकांनीही अभिनय कौशल्य याचे धडे गिरवले. आपल्या अध्यापन कौशल्यामध्ये रंजकता कशी आणावी, तसेच मुलांची कलात्मक वाढ झाली तर एकूणच व्यक्तिमत्व गुणात्मक वाढ होईल असा अनुभव या कार्यशाळेतून या शिक्षकांना आला असे शिक्षकांतर्फे सांगण्यात आले.
पुणे आजूबाजूची उपनगरे, सातारा ,माणगाव, कोकण, तळकोकण येथे या कार्यशाळा तेथील संयोजक ,सरपंच यांच्या मदतीने पार पडल्या. यामध्ये अजय मोरे, निशा महागावकर, महादेवी कांबळे, प्रताप निकम, उषा देशपांडे ऋतुजा केळकर, यांच्यासारख्या अनेक गाव आणि खेडे पातळीवर संयोजन करून या कार्यशाळा योग्य नियोजनातून पार पाडल्या. नाटक हे व्यवसायापुरते नाही तर त्याचा उपयोग आपले वागणे तंदुरुस्त करणे, यासाठीही होऊ शकतो यासाठी या कार्यशाळा बालकुमार, युवा, ज्येष्ठ आणि श्रेष्ठांसाठी उपयोगी पडल्या आहेत, असे प्रतिपादन यानिमित्ताने देवदत्त पाठक यांनी केले आहे. त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या शिष्यवर्गातील मिलिंद केळकर या सर्वोत्तम शिष्याने रंगभूमी कला ही फक्त सहवासांसाठी नाही तर ती प्रत्येकासाठी, स्वतःचं व्यक्त होण्याचं हक्काचं साधन आहे ,यासाठी ते साधन सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही गावागावात ,जाण्याचा गेल्या बारा वर्षांपासून प्रयत्न करतो आहोत, असे मत मांडले.
गुरुस्कूल गुफानच्या वतीने होणारा हा अनोखा मोफत उपक्रम उन्हाळ्यामध्ये सुद्धा अत्यंत उत्साहाने आणि लक्षणीय संख्येने (९४५) पार पडला.फक्त आणि फक्त ग्लॅमर आणि प्रसिद्धीच्या मागे धावणाऱ्या आजच्या रंगकर्मींनी कधीतरी गावात जाऊनही काम करावे आणि आपल्या अनुभवाचा तेथील मुलांना फायदा करून दावा, असे प्रा.देवदत्त पाठक यांनी सुचवले आहे.