मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी
अर्नाळा: अर्नाळाच्या प्रभात कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या भक्तिभाव, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला. अभिषेक, महापूजा, आरती, नामस्मरण, दर्शन तसेच ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. सदानंदबुवा गोखले यांच्या प्रभावी कीर्तनाने परिसर भक्तिमय झाला. त्यांनी आपल्या कीर्तनातून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या विचारांचा, सदाचाराचा आणि मानवतेच्या संदेशाचा प्रभावी जागर केला.
यावेळी आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात प्रगतीबरोबरच माणुसकी, करुणा आणि संवेदनशीलता जपणे हीच काळाची खरी गरज असल्याचा संदेश देण्यात आला. श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण सत्य, सेवा, प्राणीमात्रावरील प्रेम आणि मानवकल्याणाचा मार्ग दाखवणारी असल्याचेही सांगण्यात आले.
स्थानिक परंपरेनुसार, वर्ष १८०० च्या सुमारास श्री स्वामी समर्थ महाराजांनी अर्नाळा परिसरात वास्तव्य केले होते. त्याच दैवी प्रेरणेतून विनायक गुळगुळे व नूतन गुळगुळे यांनी वर्ष २०१५ मध्ये गजलक्ष्मी स्वरूप कमळासनाधिष्ठित श्री स्वामी समर्थ शक्तीस्थानाची स्थापना केली.
या शक्तीस्थानातील ‘स्वानंद सेवा सदन’ या उपक्रमाद्वारे ग्रामीण व आदिवासी भागातील दिव्यांग महिला, मुले आणि युवकांना मोफत निवारा, भोजन, शिक्षण, पुनर्वसन, कौशल्य विकास आणि स्वावलंबनासाठी आवश्यक मार्गदर्शन दिले जाते. सध्या १७ निराधार दिव्यांग भगिनी व मुलांचे विनामूल्य संगोपन व शिक्षण येथे सुरू असून, हे कार्य नूतन गुळगुळे फाउंडेशनच्या अध्यक्षा नूतन गुळगुळे यांच्या नेतृत्वाखाली निरपेक्ष भावनेने सुरू आहे.
गुरुपौर्णिमेच्या या सोहळ्यास सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक संजय जाधव, डॉ. चाफेकर, चंद्रकांत भोईर, डॉ. महेश अभ्यंकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले. त्यांनी स्वानंद सेवा सदनातील दिव्यांग भगिनी व मुलांशी संवाद साधत त्यांना प्रोत्साहन दिले आणि संस्थेच्या सेवाकार्याचे कौतुक केले.
गुरुपौर्णिमा हा केवळ धार्मिक उत्सव नसून सद्गुरूंच्या शिकवणीचे आचरण करण्याचा संकल्प आहे. सत्य, करुणा, मानवता आणि समाजसेवा यांचा स्वीकार करणे, हीच श्री स्वामी समर्थ महाराजांना अर्पण केलेली खरी गुरुदक्षिणा असल्याचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.