मुंबई: जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्र. पा. हायस्कूल मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी SFS 2026 (Solve for Society) – Phase 1 मध्ये मिथेनच्या वातावरणावरील परिणामाचा अभ्यास करणाऱ्या नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी देशातील टॉप ३० संघांमध्ये स्थान मिळविले.
या प्रकल्पात मिथेनचे पर्यावरणावरील परिणाम, त्याचे विविध पैलू तसेच पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासासाठी वैज्ञानिक उपाययोजनांचा अभ्यास करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव आणि सर्जनशीलतेचा प्रभावी संगम साधला.
या यशामुळे विद्यार्थ्यांची Phase 2 – Prototyping साठी निवड झाली असून मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (IIT Bombay) तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रोटोटाइप विकसित करण्यासाठी मार्गदर्शन मिळणार आहे. या प्रकल्पासाठी अनुजा आनंद थोरात व कुमारी सिद्धी अडकर यांचे मार्गदर्शन लाभले. सिद्धेश भोसले, प्रविण खोंदल, कृष्णा चौगुले, संस्कार शिगवण आणि सुशांत गोताड यांनी सहभाग घेतला. या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी सर्वांचे अभिनंदन केले.